आमदार डॉ. निंबाळकर यांची सूचना : अंमलबजावणीचे आश्वासन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यात ज्या ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात मराठी भाषिकांचे प्राबल्य आहे, त्या ठिकाणी ग्राम वन योजनेचे फलक कानडी भाषेबरोबरच मराठी भाषेतूनही लावावेत, अशी सूचना आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी हलकर्णी येथे ग्राम वन योजनेच्या उद्घाटनावेळी केली.
त्या म्हणाल्या, काही ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील मराठी भाषिकांना कन्नड भाषा येत नाही. सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी ग्राम वन फलकावर लावलेली सर्व माहिती प्रत्येकाला समजणे गरजेचे आहे, तरच ती योजना खऱया अर्थाने यशस्वी होऊ शकेल. याकरिता कानडीबरोबरच मराठी भाषेतही ग्राम वन योजनेची माहिती देणारे फलक लावावेत, अशी सूचना अधिकाऱयांना केली. ग्रेड टू तहसीलदार बिद्री यांनी या सूचनेच्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले.
यापूर्वी खानापूर तालुक्यात विशेषतः पश्चिम भागात रस्त्यांचे नामफलक तसेच ग्रा.पं. कार्यालयातील फलक केवळ कानडीतच होते. त्यावेळी आमदार निंबाळकर यांनी मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या ग्रा.पं.च्या विकास अधिकाऱयांची बैठक घेऊन हे फलक मराठी भाषेतही लावावेत, अशी सूचना करून अंमलबजावणी करून घेतली होती. खानापूर तहसीलदार कार्यालयावर केवळ कानडीच फलक होता.
खानापूरचे तहसीलदार शिवानंद उळ्ळागड्डी सेवा बजावत होते, त्यावेळी आमदार डॉ. निंबाळकर यांच्या सूचनेची अंमलबजावणी केली. विधानसभा निवडणुकीत डॉ. निंबाळकर यांच्या प्रचारासाठी तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या आले होते. तालुक्यातील मराठी भाषिकांनाही न्याय मिळावा, यासाठी सरकारी कागदपत्रे कानडीबरोबरच मराठी भाषेतूनही देण्याची मागणी करून प्रयत्नही केले होते. पण कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजप शासनाने त्या मागणीकडे दुर्लक्ष केले. यामुळे ती मागणी पूर्ण होण्यासाठी अद्यापही आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे प्रयत्न सुरू आहेत.