रत्नागिरी जिह्यात शिवसेनेला चांगले यश मिळाले. सिंधुदुर्ग जिह्यात मात्र नारायण यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जोरदार मुसंडी मारत राजकीय निरीक्षकांसमोर नवा मुद्दा उपस्थित केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकींचा महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला. गावकऱयांनी आपापले कारभारी पाच वर्षांसाठी निवडले. लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थांमध्ये आपल्याला कोण उपयोगी पडेल याचा विचार करून लोकांनी मतदान केले आहे. रत्नागिरी जिह्यात शिवसेनेला चांगले यश मिळाले. सिंधुदुर्ग जिह्यात मात्र नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जोरदार मुसंडी मारत राजकीय निरीक्षकांसमोर नवा मुद्दा उपस्थित केला आहे.
सिंधुदुर्ग जिह्यात भाजपला 42 ग्रापंमध्ये मताधिक्य मिळाले. शिवसेनेला 22 ग्रापंमध्ये बहुमताचा दावा करता आला आहे. महाविकास आघाडीच्या नावाखाली लढणाऱया काँग्रेस आघाडीला केवळ एका ग्रापंमध्ये यश मिळवता आले आहे. ग्रामविकास आघाडी म्हणून तीन ठिकाणी यश मिळाले आहे. दोन ग्रापंमध्ये त्रिशंकू अवस्था झाली आहे. यापूर्वी अनेक ग्रा.पं. शिवसेनेकडे असताना यावेळी भाजपने त्या आपल्याकडे खेचून घेतल्या आहेत.
या निवडणुकीत खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने चांगले यश संपादन केले. त्या पाठीमागे कोणती कारणे असावीत यावर राजकीय निरीक्षकात चर्चा रंगली आहे. भाजपची जडणघडण संघटनात्मक ढाच्यावर उभी राहिली आहे. यापूर्वी सिंधुदुर्गात हा पक्ष अलीकडच्या काळात बेताबाताने आपले अस्तित्व राखून होता. राणे यांच्या भाजपा प्रवेशानंतर पक्षाची ताकद वाढली. कणकवलीपासून दोडामार्गपर्यंत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी व्यवस्था उभी रा†िहली.
कणकवली-देवगडचे आमदार नितेश राणे यांनी ग्रा.पं. निवडणुकीपूर्वी खूपच तपशिलात जाऊन कामे केली. गाव पातळीवरच्या उमेदवारांना योग्य मार्गदर्शन करून पाठीशी ताकद उभी केली. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी पक्ष कामगिरीच्या खास बाबी कार्यकर्त्यांपर्यंत पोचवल्या. मजबूत संघटन ढाच्याच्या आधारे भाजप मैदानावर उतरला. राणे यांचे सहकारी राजकीय अनुभवी होते. यापूर्वी ते शिवसेनेत होते. त्यामुळे शिवसेनेशी दोन हात करण्याची कला अधिक चांगल्याप्रकारे त्यांना अवगत होती. ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी होती. त्यामुळे कार्यकर्ते अधिक जोर लावून निवडणूक लढत होते.
दुसऱया बाजूला सिंधुदुर्गात माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा जनसंपर्क अलीकडच्या काळात कमी झालेला जाणवत होता. आमदार वैभव नाईक यांनी बळकट संघटनेच्याऐवजी व्यक्तिगत संपर्काच्या आधारे निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. खासदार विनायक राऊत यांनी काहीशा दुरून ही निवडणूक पार पाडण्याकरिता मदत केली. पालकमंत्री उदय सामंत लक्ष ठेवून होते. तथापि संघटनेपेक्षा व्यक्तिगत संपर्कावर शिवसेनेने भर दिला. परंतु त्याचा लाभ झाल्याचे दिसले नाही.
अलीकडे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी प्रसार माध्यमात वारंवार विधाने करण्याऐवजी मोजकेच पण प्रभावी शब्द बोलावे असे ठरवल्याचे दिसते. लोकांवर याही मुद्याचा काही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. राणेंच्या मोजक्या बोलण्याने त्यांच्याविषयीची सहानुभूती काही प्रमाणात वाढत आहे. भाजपचे परंपरागत हितचिंतक देवगड, दोडामार्ग परिसरात लक्षणीय रीतीने आहेत. त्यांचा योग्य उपयोग संघटनात्मक व्यवस्थेतून करण्यात आला. सिंधुदुर्गात भाजपला मिळालेले दणदणीत यश हा शिवसेनेसाठी मोठा इशारा आहे. सध्या कणकवली विधानसभेची एक जागा असली तरी अन्य दोन जागांवर देखील यश मिळावे या हेतूने राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने वाटचाल सुरू ठेवली आहे. राज्यात सत्ता हाती असलेल्या शिवसेनेला हे मोठेच आव्हान ठरणार आहे.
रत्नागिरी जिह्यात 479 ग्रा.पं.च्या निवडणुकांचा कार्यक्रम पार पडला. त्यापैकी 119 ग्रा.पं. मध्ये सदस्य बिनविरोध निवडून आले. 360 ग्रा.पं. मध्ये मतदान झाले. यापैकी सुमारे 300 ग्रा. पं. मध्ये शिवसेनेला विजय मिळाल्याचा दावा त्या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
रत्नागिरी जिह्यातील ग्रा.पं.च्या निवडणुकांमध्ये कमी अधिक प्रमाणात सर्वच आमदारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजप अनेक ठिकाणी शिवसेनेविरोधात उभा राहिला होता. भाजपला रत्नागिरी जिह्यात आमदारकी किंवा जि.प. सदस्यत्व मिळवता आलेले नाही. तथापि, संघटनात्मक ढाच्याच्या आधारावर पक्षाने ही निवडणूक लढवली. जिह्यात 296 सदस्य भाजपा पुरस्कृत निवडून आले असल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. भाजपाकडे या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे लढण्याची पहिल्यांदाच वेळ आली. यावेळी अधिक ग्रापं.वर सत्ता मिळवणे पक्षाला शक्य झाले नसले तरी अनेक ग्रा.पं. मध्ये पक्षाचे प्रतिनिधी पोहोचले आहेत. त्यांच्या आधारे पक्षाला सत्ताधाऱयांवर वचक ठेवणे शक्य होणार आहे. दुसऱया बाजूला ग्रा.पं.मधील व्यापक सत्तेच्या आधारावर शिवसेनेला भविष्यातील रुबाब ठेवता येणार आहे.
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात पेट्रेकेमिकल्स रिफायनरी उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. रिफायनरीच्या भूसंपादनाची अधिसूचना फडणवीस सरकारने शिवसेनेच्या आग्रहास्तव रद्द केली होती. आता याच ठिकाणी पुन्हा रिफायनरी उभारावी अशी मागणी रत्नागिरी जिह्यातील अनेक ठिकाणाहून होत आहे. या पार्श्वभूमीवर रिफायनरीच्या प्रस्तावित क्षेत्रापैकी तीन ग्रा.पं.मध्ये निवडणूक पार पडली. यात निवडून आलेले सर्वच्या सर्व 25 सदस्य रिफायनरीविरोधी असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तथापि राज्य सरकारसमोर प्रस्तावित असलेला रिफायनरीचा मुद्दा या निवडणुकीशी निगडित राहिलेला नाही.
ग्रा.पं. निवडणुका हा राजकीय पक्षांसाठी प्राथमिक स्तराचा मुद्दा आहे. यातून पुढे जाणारे कार्यकर्ते पक्षाकरिता महत्त्वाचे ठरतात असे लक्षात आल्याने या निवडणुकांकडे लक्ष दिले गेले. निवडून आलेले गाव कारभारी सत्तेचा उपयोग नेमका कसा करणार यावर पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे.
सुकांत चक्रदेव








