वार्ताहर/ किणये
दिवाळीच्या सणानिमित्त ग्रामीण भागात साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे मोठय़ा उत्साहात व जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून गावागावांमध्ये या उद्घाटन सोहळय़ांना प्रारंभ झाला असून, गल्ली-चौकांमध्ये किल्ले निदर्शनास येत असल्याने अवघा ग्रामीण भाग शिवमय बनला आहे.
दिवाळी सणात बालचमूंना गड-किल्ल्यांचे वेध लागतात. गेल्या 20 दिवसांपासून बालचमूंनी गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. हे किल्ले बनविण्यासाठी माती, दगड, गोळे, प्लास्टर, सिमेंट, रंग आदींचा उपयोग करून किल्ल्यांच्या हुबेहुब प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत.
इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून या प्रतिकृती साकारण्यास तरुणांना मदत झाली आहे. सिंधुदुर्ग, प्रतापगड, रायगड, सज्जनगड, सिंहगड, राजहंसगड, तोरणा अशा किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. किल्ल्यांमध्ये सिंहासनावर आरुढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, किल्ल्यावर रक्षण करणारे त्यांचे मावळे, तोफा ठेवण्यात आलेल्या आहेत. किल्ल्यांचा सुरक्षित भाग, प्रवेशद्वार, किल्ल्यात असणारी झाडेझुडूपे, विहिरी, भवानीमातेचे मंदिर आदी किल्ल्यांमध्ये दाखविण्यात आले आहे.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर किल्ल्यांचे उद्घाटन करण्यात आले असून, किल्ले बनविण्यात आलेल्या ठिकाणी विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम करण्यात येत आहेत. यामुळे तरुणांमध्ये उत्साह दिसून येत आहे. येणारे आठ दिवस तरी बालचमू या किल्ल्यांमध्ये दंग असणार आहेत.
सोनोली येथे बालचमूंनी प्रतापगड साकारलेला आहे. हा किल्ला इतका सुंदर व आकर्षक बनविलेला आहे की, रस्त्यावरून ये-जा करणारे शिवभक्त हमखास या ठिकाणी येऊन या किल्ल्याचे दर्शन घेत आहेत. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून या किल्ल्यासाठी बालचमूने परिश्रम घेतलेले आहेत. मंथन पाटील, रवि पाटील, किरण पाटील, सर्वेश पाटील, प्रणव शिंदे, चैतन्य पाटील आदींनी हा किल्ला बनविला आहे.
सोमवारी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या किल्ल्याचे उदघाटन करण्यात आले. मोहन पाटील, भारतीय सेनेतील जवान दयानंद पाटील, महेश पाटील, सचिन पाटील आदींच्या हस्ते किल्ल्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास या किल्ल्यांच्या माध्यमातून बालचमू व तरुणांना मिळतो, असे मनोगत यावेळी दयानंद पाटील यांनी व्यक्त केले.
बहाद्दरवाडी येथे साकारलेल्या राजहंसगड किल्ल्याचे उद्घाटन उद्योजक मल्हारी पाटील व शांता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या गावातही सुमारे दहा ते बारा किल्ले बनविण्यात आलेले आहेत. विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. गड-किल्ले बनविणाऱया बालचमूंना सर्व स्तरातून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, असेही पाटील यांनी बोलताना सांगितले.
मारुतीनगर पिरनवाडी येथील जिजाऊ युवा आघाडी या मंडळाच्यावतीने किल्ले श्री कलानिधीगड साकारण्यात आला आहे. हा किल्ला बनविण्यासाठी रोहित सनदी, शुभम देसाई, आदित्य शिंदे, आदित्य गावडे, ओमकार सनदी, स्वयं रेणके, वेदांत शिंदे, तुषार नायक, विनायक हण्णीकेरी आदींनी परिश्रम घेतले आहेत.









