ऑनलाईन टीम / बेंगळूर :
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर (वय 44) याला झारखंडमधील धनबाद येथून अटक करण्यात आली आहे.
5 सप्टेंबर 2017 रोजी बेंगळूरमध्ये गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर हा काही दिवसांपासून फरार होता. देवडीकर धनबादमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काल सायंकाळी धनाबाद येथे छापा टाकून देवडीकर याला ताब्यात घेतले.
देवडीकर हा मूळचा औरंगाबादमधील आहे. तो झारखंडमधील धनाबादमध्ये नाव बदलून राहत होता. कतरासमधील एका पेट्रोल पंपावर तो काम करत होता. आज त्याला धनाबादमधील कोर्टात हजर करण्यात येणार आहे.