विरोधी पक्षनेत्याची सरकारवर टीका
प्रतिनिधी / मडगाव
मागच्या दहा दिवसात जागतिक पातळीवर इंधनाचे दर कमी झालेले असतानाही गोव्यात पेट्रोलचे दर रु. 5.47 व डिजेलचे दर रु. 5.80 ने वाढवून सरकारने सामान्य माणसाचे कंबरडेच मोडण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने ताबडतोब इंधन दरवाढ मागे घ्यावी. लोकांप्रती सरकारची असंवेदनशीलता चालूच राहिल्यास जनता रस्त्यावर येण्यास मागेपुढे पाहणार नाही याचे भान सरकारने ठेवावे असा इशारा विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी दिला आहे.
कोविड संकट काळात लोकांना आर्थिक मदतीची गरज आहे. कोविड महामारीमुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊन नंतर सामान्य माणसाला त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. आज अनेक व्यवसाय बंद आहे. अनेकांना नोकऱयावरून काढून टाकण्यात आले आहे तर हजारो लोकांचे पगार कापण्यात आले आहेत. लोक सरकारकडून मदतीची अपेक्षा करीत असताना, भाजप सरकार नेमके उलटी कृती करुन जनतेलाच त्रास देत असल्याचे श्री. कामत यांनी म्हटले आहे.
अर्थव्यवस्था व कोविड वर श्वेत पत्रिका जारी करा
राज्याच्या अर्थव्यवस्थेची सद्य परिस्थिती व कोविड संबंधी सरकारने श्वेत पत्रिका जारी करावी अशी मागणी काँग्रेस व इतर सर्व विरोधी पक्ष करीत आहेत. अनेक वेळा मागणी करुनही सरकार त्याकडे कानाडोळा करीत आहे. सरकारने सत्य परिस्थीती जनतेसमोर न ठेवल्यास लोकांचा संयम सुटेल व त्यानंतर उद्भवणाऱया परिस्थीतीला सर्वस्वी भाजप सरकार जबाबदार राहील असा इशारा विरोधी पक्षनेत्यांनी दिला आहे.
सन 2016 मध्ये गोव्यात पेट्रोलचे दर रु. 60च्या वर जाणार नाहीत अशी घोषणा भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यानी केली होती त्याची आठवण करुन देत, सदर घोषणा निवडणुकीसाठीचा जुमला होता का ? असा प्रश्न विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी विचारला आहे.









