गोव्याची विधानसभा जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी राजकीय पक्ष, नेते यांच्या तयारीला वेग येत आहे. निवडणुकीच्या या माहोलात इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे मतदारांची चंगळ मात्र वाढतच आहे.
गोव्याची विधानसभा जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी राजकीय पक्ष, नेते यांच्यामधील ‘दंगल’ वाढू लागली असून दुसऱया बाजूने मतदारांची चंगळही वाढू लागली आहे. एका बाजूने अचानक राजकीय पक्षांची संख्या वाढली तर दुसऱया बाजूने निवडणूक लढवू पाहणाऱयांचीही संख्या वाढत आहे. निवडणुकीच्या या माहोलात इच्छुकांचा किती फायदा झालाय किंवा होईल, याचे साधे ठोकताळेही मांडता येत नाहीत, मात्र इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे मतदारांची चंगळ मात्र वाढतच आहे. मतदान फेबुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या प्रारंभी होणे अपेक्षित आहे. त्याअगोदरच मतदारांना खुश ठेवून त्यांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न सर्वांनीच सुरु ठेवलेला आहे. त्यामध्ये मंत्री, आमदार, यांच्यासह माजी आमदार, माजी मंत्री, नवोदीत, होतकरु उमेदवार म्हणजे एकंदरीत हवशे, गवशे आणि नवशे अशा साऱयांचाच त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे लोकांची बरीच चंगळ झालेली आहे. गेल्या दोन वर्षांत गोव्यात विविध पक्षांच्या राजकारण्यांकडून, समाजसेवकांकडून मतदारांना जेवढय़ा वस्तू मिळाल्या आहेत त्या पाहता ही चंगळच म्हणावी लागेल आणि ती मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत सुरु राहील, असे भाकीत करण्यासाठी कुण्या राजकीय अभ्यासकाची गरज भासू नये.
सत्ताधारी भाजपसह विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादी, मगो, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष हे सध्या गोवा विधानसभेत आहेत. गोवा सुरक्षा मंच, शिवसेना, आप आणि आता तृणमुल काँग्रेसही विधानसभेत प्रवेश करु पाहत आहेत. यापैकी आपचा थाट पाहता जणू आगामी सरकार त्यांचेच असेल असे कुणालाही वाटू शकेल. त्यांच्या लोकप्रिय घोषणा आणि पर्रीकरांच्या बाबतीतील त्यांची वक्तव्ये पाहता ‘स्व. मनोहर पर्रीकर हायजॅक’ करण्याचा प्रयत्न वाटतो. काँग्रेस गेली साडेचार वर्षे अंतर्बाहय़ संघर्षच करत आहे. पहिल्यांदा दहा आमदार फुटले आणि आता लुईझिन फालेरो हे दिग्गज काँग्रेसमन फुटले. भाजपशी संघर्ष करत असतानाच अंतर्गत संघर्षालाही तोंड देणाऱया काँग्रेसचे भवितव्य काय? हा प्रश्न काँग्रेसच्या सच्च्या कार्यकर्त्यांना पडणे साहजिक आहे. तशातच आता तृणमुलने प्रवेश करुन काँग्रेस कार्यकर्त्यांना तसेच पारंपरिक मतदारांनाही द्विधा मनःस्थितीत टाकले आहे. एकटय़ा भाजपमध्ये प्रत्येक मतदारसंघात किमान तीन ते पाचजण इच्छुक म्हणा दावेदार आहेत. काँग्रेसमध्येही दोन-तीन जण आहेत. गोवा फॉरवर्ड, मगो, गोवा सुरक्षा मंच, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचेही अनेक इच्छुक आहेत. आपचेही भरपूर आहेत अन् आता तृणमुलचेही भरपूर असतील. त्यामुळे मतदाराजाला या निवडणुकीत ‘चॉईस’ मोठा मिळणार आहे.पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने गटबाजीचा रोग सर्वच पक्षांना नामोहरम करत आहे, एकवेळ कोरोना परवडला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. तृणमुलने काँग्रेसची झोप उडवून दिली असून काँग्रेसकडील ख्रिस्ती नेते आपल्याकडे खेचून त्या ‘वोट बँक’वर स्वार होत गोवा विधानसभेत प्रवेश करण्याची ‘प्रशांत किशोरी’ तयारी ममता बॅनर्जीनी चालवली आहे. आप गोव्यात येऊन काँग्रेसच्या वोटबँकेला खिंडार पाडत असतानाच आता तृणमुलही मोठी नांगरणी काँग्रेसच्याच शेतावर करत आहे. अन्य पक्षांनीही या दंगलीत आपलीही शक्ती आजमावण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला आहे. त्यामुळे सर्व विरोधकांनी आपसात दंगल माजविलेली असल्याने सत्ताधारी भाजप सध्यातरी ‘सेफ झोन’मध्ये आहे.इच्छुकांच्या वाढत्या संख्येचा मतदारांना चांगलाच लाभ होत असून त्यांच्यामधील दंगलीमुळे मनोरंजनही चांगलेच होत आहे. एकमेकांवर केल्या जाणाऱया शाब्दिक कुरघोडय़ा, फुकटय़ा घोषणांचा पाऊस, चकवा देणारी भुलभुलैयी आश्वासनांमुळे पक्षांपक्षांमधील आणि इच्छुकांमधील ही दंगल चांगलीच रंगतदार होऊ लागल्याने लोकांचे रोजचे ‘टेन्शन’ काही प्रमाणात का होईना कमी होत आहे. बॅनर्स, कटआऊट्स, झेंडे यांची मागणी वाढत्याने व्यवसायही तेजीत आलाय. मतदारांना देण्यासाठी मिक्सर, इंडक्शन, ओवनसारख्या वस्तूंमुळे तेथेही व्यवसाय वाढला आहे. एकंदरीत कोरोनाच्या दोन लाटेतून बाहेर पडलेल्या गोव्यात आर्थिक उलाढाल बरीच वाढू लागली आहे, या साऱयाचा सगळय़ात अगोदर थेट लाभ जर कुणाला मिळत असेल तर तो मतदारराजाला! कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेच्या काळात विविध राजकीय पक्षांच्या आमदारांनी तसेच निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अन्य समाजसेवकांनीही मोठय़ा प्रमाणात घरोघरी मोफत कडधान्य, भाजीपाला, मास्क, सॅनिटायझर पोहोचविले. गणेशचतुर्थी, दिवाळीच्या काळातही शिधा पोहोचविला. गंमतीचा प्रकार म्हणजे ज्यांनी दिवाळीला घरोघरी पोहे आणि गुळ पोहोचविले त्यांना मतदारांनी पोहय़ांना नारळ पण लागतो, तो कोण देणार? असाही सवाल केला. आश्चर्य म्हणजे नंतर घरोघरी नारळ पोहोचविणारे समाजसेवकही गोव्याने पाहिले. महामारी, लॉकडाऊनच्या काळात मतदारांची जी चंगळ सुरु झाली ती अजूनही सुरुच आहे. आता या इच्छुकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मतदारांना आमंत्रित करुन सुग्रास भोजनाबरोबरच जाताना गिफ्ट म्हणून महागडय़ा वस्तूही वाटल्या जात आहेत, त्यातही महिलांची अधिक चंगळ होतेय कारण ‘सप्रेम भेट’ दिल्या जाणाऱया वस्तू अधिकतर महिलांच्या पसंतीच्या असतात. पाकिटेही वाटली जातात. विविध प्रकारच्या स्पर्धांच्या आयोजनालाही उत आला असून जी स्पर्धा तीस-चाळीस हजारात व्हायची तिच्यावर आता दोन-अडीच लाख रुपयांचा पाऊस पडू लागला आहे. रस्ते सुद्धा तयार करुन दिले जात आहेत. मुलांना मोबाईल, लॅपटॉप, शैक्षणिक शुल्क, वयोवृद्धांना औषधे, विविध प्रकारची आरोग्य यंत्रे, व्हिलचेअर अशा वस्तू निवडणुकीतील इच्छुकांकडून मिळत आहेत. ही सारी चंगळ दोन वर्षांपासून सुरु असून तिची आर्थिक उलाढाल शेकडो कोटय़वधींच्या घरात असली तर कोणी फार मोठे आश्चर्य मानून घेऊ नये. ही दंगल, ही चंगळ लोकशाहीला किती मारक अन् किती पोषक हा वेगळा विषय पण तिचा निवडणुकीवर परिणाम होणार का याबाबतही स्पष्टता नसली तरी कोरोनाच्या तडाख्यात पिचलेल्या जनतेला थोडा तरी आधार मिळाला, हेच खरे!
राजू नाईक








