जागतिक पर्यावरण दिन
प्रज्ञा मणेरीकर / पणजी
विस्तीर्ण समुद्र किनारे, डोंगरामधील वळणदार रस्ते, नारळाच्या झाडांमध्ये लपलेली टुमदार घरे, अशा निसर्गसौंदर्याने समृद्ध गोव्याची भुरळ पर्यटकांमध्ये आहे. पर्यटकांच्या नकाशावर जिव्हाळय़ाचे स्थान मिळविलेल्या गोव्याचे पर्यावरण धोक्यात येताना दिसून येत आहे. विविध प्रकल्प, घातक रसायने, प्रदूषणांमुळे गोवा काळवंडत असून पर्यटकांमधील समृद्ध गोव्याची भूरळ कमी होईल का यात शंका निर्माण होत आहे. विकासाच्यादृष्टीने गोवा जरी पुढे जात असला तरी नैसर्गिक संपदेच्या संवर्धनात मागे पडत आहे. विकासाबरोबरच गोव्याच्या नैसर्गिक जीवसृष्टीचे जतन करण्याची सध्या आवश्यकता भासत आहे.
पोषक वातावरण निर्माण करण्याचा हेतू
आज दि. 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. 1972पासून संयुक्त राष्ट्राने 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचे जाहीर केल्यानंतर हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. परंतु सध्या हा पर्यावरण दिन फक्त नावापुरताच मर्यादित राहिला आहे.
जैवविविधता नष्ट होतेय
विविध प्रकल्पामुळे तसेच औद्योगिक वसाहतीच्या घातक रसायनांमुळे आज जैवविविधता नष्ट होत चालली आहे. प्लास्टिक वस्तू, जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनिप्रदूषणामुळे पर्यावरणाच्या ऱहास होत चालला आहे. या संदर्भात अनेक कायदे व नियम आहेत. परंतु ते फक्त कागदावरती अस्तित्त्वात आहेत. त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. सरकारने कायद्यांची कठोररित्या अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
जलस्रोतांचे अस्तित्त्व संकटात
आज मानवी समाजाने आपल्या विकासाचा रथ पुढे नेताना, पर्यावरणीय मूल्यांकडे दुर्लक्ष करण्यात रस घेतला आहे. राज्यात सध्या सिमेंट क्रॉकिंटच्या बांधकामामुळे व त्यामुळे होणाऱया प्रदुषणांमुळे नद्या, शेती प्रदूषित होत आहेत. पर्यटकांसाठी आकर्षण असलेली अनेक ठिकाणे प्रदूषणामुळे, कचऱयामुळे विशेष म्हणजे रेल्वेवाहतूकीमुळे घातक वनस्पती शिकार ठरले आहेत. समुद्रकिनारेही स्वच्छ राहिले नाहीत. ट्रॉलरने होणाऱया बेसुमार आणि अपारंपरिक मासेमारीमुळे मासळीवर संक्रांत आली आहे. एवढेच नव्हे तर या भागातील बोटी, क्रूझमध्ये तयार होणारे प्रदूषित, सांडपाणी समुद्रात नदीत सोडले जाते. यावरून नद्यांचे पर्यावरण धोक्यात येत आहे. चोडणसारख्या बेटावरचे खारफुटीचे सुरक्षा कवच संकटात पडले आहे. समुद्रातील प्रदूषणामुळे आणि किनारपट्टीवर होणारा कचरा तसेच जलक्रीडामुळे काही ठिकाणी कासव मरण्याची प्रकरणे समोर येत आहेत. ही संपत्ती वाचविण्यापेक्षा ती संपविण्याचा प्रयत्न जास्त केला जात आहे. खाणव्यवसायामुळे नैसर्गिक जलस्रोतांचे अस्तित्त्व संकटात आले आहे.
राज्यातील हवा प्रदूषित
गोव्याची हवा आज फार प्रदूषित आहे. वातावरणातील धूळीचे प्रमाण वाढत आहे. शेतीसाठी सुपीक असलेली जमीन कीटकनाशके, घातक रसायनामुळे पडीक बनत चालली आहे. सर्वच अन्नातून रासायनिक प्रदूषण घरात पोहचत आहेत. पिण्याचे पाणी पिण्यालायक नसल्याने बाटलीबंद पेयजल विकत घ्यावे लागत आहे. याचबरोबर राज्याच्या जीवनदायिनी म्हटल्या जाणाऱया नद्याही प्रदूषित होत आहेत. गोव्यातील नद्या दूषित होण्याची कारणे वेगवेगळय़ा ठिकाणी निरनिराळी आहेत. शेतांमध्ये वापरली जाणारी खते, कीटकनाशके पावसाळय़ात पाण्याबरोबर वाहत नद्यांमध्ये येतात. हे कारण राज्यातील सरसकट सर्वच नद्यांना लागू होते. मांडवी नदीमध्ये कुंडई औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे सांडपाणी, तसेच राजधानी शहरात नदीपात्रातील कॅसिनो जहाजांचा कचरा सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे मांडवी नदी प्रदूषित झाली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या अहवालानुसार मांडवी, झुवारी, साळ, तळपण यासारख्या नद्या औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषित झाल्या आहेत.
‘वनश्री हीच खरी धनश्री’
झाडे-वेली, पशु-पक्षी, किडे-कीटक हे सजीवसृष्टीला केवळ देण्याचेच काम करीत असतात. ‘वनश्री हीच खरी धनश्री’ आहे. झाडे फक्त लावूनच भागणार नाहीत, तर ती खऱया अर्थाने जगवली गेली पाहिजेत. पर्यावरणाचा ऱहास झाला तर मानवजात या पृथ्वीवरून एक दिवस नष्ट होईल, यात शंकाच नाही. दरवर्षी गोव्यात हजारो पर्यटक येतात. स्वच्छंदी जगण्याची मजा अनुभवतात. इथली संस्कृती जगण्याचा प्रयत्न करतात. गोवा म्हणजे फक्त आनंदी जगणे, एवढेच अनेकांना माहिती आहे. हे अनोखं जगणं देणारी निसर्ग संपदा जपण्यासाठीही आता प्रयत्न झाले पाहिजेत.








