गोव्याची आघाडी अजूनही 302 धावांची; मोहित रेडकर, अर्जुन तेंडुलकरच्या मोक्याच्याक्षणी विकेट्स
क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
अर्जुन तेंडुलकर आणि मोहित रेडकर यांनी काल शेवटच्या सत्रात घेतलेल्या विकेट्समुळे गोव्याने रणजी गट ‘क’ गटातील राजस्थानविरुद्धच्या लढतीच्या तिसऱया दिवशीअखेर आपलं वर्चस्व राखले. पर्वरी क्रिकेट अकादमीवर खेळविण्यात येत असलेल्या या लढतीच्या तिसऱया दिवशीअखेर राजस्थानने गोव्याच्या पहिल्या डावातील 9 बाद 547 (घोषित) धावाना 6 बाद 245 धावाचे उत्तर दिले आहे.
गोवा अजूनही पहिल्या डावात 302 धावानी आघाडीवर असून आज या लढतीचा शेवटचा दिवस आहे. सामना अनिर्णीत राहाणार हे निश्चित असले तर पहिल्या डावातील आघाडीला आता महत्त्व आहे. गोव्याला पहिल्या डावात आघाडी घेण्याची चांगली संधी आहे.
गोव्याने त्यापूर्वी 8 बाद 493 धावावरून खेळण्यास सुरुवात केल्यानंतर आपल्या डावात आणखी 54 धावांची भर घातली आणि डाव 9 बाद 547 धावावर घोषित केला. मोहित रेडकरने (28 धावा, 38 चेंडू, 3ƒ4, 2ƒ6) आणि लक्षय गर्गने (नाबाद 25, 27 चेंडू, 4ƒ4) जलद धावा केल्या. राजस्थानसाठी अराफत खानने 3 तर अनिकेत चौधरी, कमलेश नागरकोटी व मानव सुतारने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
राजस्थानला धावचितच्या रूपाने पहिला धक्का बसला. यश कोठारीने मारलेला फटका गोलंदाज लक्षय गर्गच्या हाताला स्पर्श करून विकेटवर आदळला. यावेळी अभिजीत तोमर क्रिझच्या बाहेर होता. त्यानंतर यश कोठारी (96 धावा, 93 चेंडू, 17ƒ4, 1ƒ6) आणि महिपाल लोमरोर (63 धावा, 156 चेंडू, 8ƒ4, 1ƒ6) यांनी दुसऱया विकेटसाठी 128 धावांची उपयुक्त भागीदारी केली. गोव्यासाठी धोकादायक वाटणारी ही जोडी ऑफ-स्पीनर मोहित रेडकरने फोडताना शतकाच्या उंबरठय़ावर असलेल्या यश कोठारीला बाद केले.
कोठारी बाद झाल्यानंर लोमरोर आणि सलमान खान (40 धावा, 94 चेंडू, 5ƒ4) यांनी तिसऱया विकेटसाठी आणखी 54 धावा जोडल्या. महिपाल लोमरोर आणि सलमान खान या जम बसलेल्या फलंदाजांना अर्जुन तेंडुलकरने यष्टीरक्षक एकनाथ केरकरद्वारे बाद केले. 223 धावसंख्येवर सलमान बाद झाल्यानंतर मोहित रेडकरने एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्या आणि राजस्थानला ‘बॅकफूट’वर आणले. प्रथम मोहितने 63व्या षटकातील दुसऱया चेंडूवर राजस्थानचा कप्तान अशोक मणेरियाला पुढे आणले आणि चकविले व त्यानंतर त्याची उर्वरित क्रिया एकनाथने त्याला स्टंप करून पार पाडली.
याच षटकातील त्याचा शेवटचा चेंडू निश्चितच ‘ड्रिम’ बॉल राहिला. ऑफ स्टंपवरून झपकन आत वळलेला हा चेंडू कमलेश नागरकोटीच्या यष्टय़ा कधी विखुरल्या हे नागरकोटीला कळले देखील नाही. तिसऱया दिवशीचा खेळ संपला तेव्हा, कुणाल सिंग राठोड व शुभम शर्मा हे अनुक्रमे 20 व 2 धावावर खेळत होते.
धावफलकः गोवा, पहिला डाव (8 बाद 493 धावावरून) – मोहित रेडकर झे. शुभम शर्मा गो. अराफत खान 28, लक्षय गर्ग नाबाद 25 धावा. अवांतर 14, एकूण 174 षटकात 9 बाद 547 (घोषित). गोलंदाजीः अनिकेत चौधरी 37-8-97-2, अराफत खान 36-8-105-3, कमलेश नागरकोटी 30-3-121-2, मानव सुतार 37-5-111-2, शुभम शर्मा 30-7-90-0, महिपाल लोमरोर 2-0-6-0, यश कोठारी 2-0-10-0.
राजस्थान, पहिला डाव- यश कोठारी झे. दीपराज गावकर गो. मोहित रेडकर 96, अभिजीत तोमर धावचित 0, महिपाल लोमरोर झे. एकनाथ केरकर गो. अर्जुन तेंडुलकर 63, सलमान खान झे. एकनाथ केरकर गो. अर्जुन तेंडुलकर 40, अशोक मनेरिया यष्टीचीत एकनाथ केरकर गो. मोहित रेडकर 12, कुणाल सिंग राठोड नाबाद 20, कमलेश नागरकोटी त्रि. गो. मोहित रेडकर 0, शुभम शर्मा नाबाद 2, अवांतर 3, एकूण 71 षटकात 6 बाद 245 धावा.
गडी बाद होण्याचा क्रमः 1-24, 2-152, 3-206, 4-223, 5-223, 6-223. गोलंदाजीः लक्षय गर्ग 14-2-43-0, अर्जुन तेंडुलकर 14-2-77-2, मोहित रेडकर 23-7-46-3, ऋत्विक नाईक 10-2-31-0, दर्शन मिसाळ 10-1-46-0).









