मनीष सिसोदिया यांचे आश्वासन, जाहीरनामा प्रकाशित
प्रतिनिधी/ पणजी
गोव्याची समृद्ध संस्कृती आणि वारसा जतन करणे तसेच सार्वजनिक सुविधांच्या विकासाद्वारे प्रगती, शहराच्या पायाभूत सुविधा, सुधारित प्रशासन आणि सर्वांगीण विकासाद्वारे आम आदमी पार्टी प्रत्येक व्यक्तीची समृद्धी सुनिश्चित करेल, असे वचन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी दिले.
आम आदमी पक्षाच्या घोषणापत्राचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. सिसोदिया यांच्याहस्ते नावेली, सांगे, कुंकळ्ळी वेळीसाठी जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. जतन, प्रगती आणि समृद्धी या तीन लोकाभिमुक मुद्यांवर हे घोषणापत्र केंद्रीत आहे
चुनी-रिवण, कोरला-काझूर, दावरे-नेत्रावळी, पत्रे-भाटी, धारणी-उगे, पेडामेळ -रिवण, पोलतादिन-मळकर्णे आणि साळजिणी या भागातील रस्ते तीन वर्षांत बांधले जातील, असे आश्वासन उमेदवार अभिजित देसाई यांनी सांगेतील नागरिकांना दिले.
कच्च्या काजूसाठी कमाल 200 रुपये प्रति किलो दर देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. तसेच त्यात वार्षिक पाच टक्क्मयांनी वाढ करणे, नेत्रावळी किंवा वड्डे येथे काजू प्रक्रिया युनिट स्थापन केले जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले.
नावेलीच्या उमेदवार प्रतिमा कुतिन्हो यांनी सायपे तलावाचे सुशोभीकरण आणि स्वच्छता करण्याचे वचन दिले. नावेलीतील रोझरी चर्च जवळ मुख्य रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी डोंगरी रोड आणि रावणफोंड रोडला जोडणारा रस्ता तयार करण्याचे वचन दिले. त्याशिवाय नावेली येथे जागतिक दर्जाचे शेतकरी संशोधन केंद्र आणि रुमडामळ येथे नवीन व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन कुतिन्हो यांनी दिले आहे.
कुंकळीचे उमेदवार प्रशांत नाईक यांनी आपल्या जाहीरनाम्यातून माकाझन, गिर्दोळी, चांदर, आंबावली आणि पारोडा येथे दर्जेदार आरोग्य सुविधा स्थापन करणे तसेच कुंकळीत 50 खाटांचे आरोग्य केंद्रही स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. चांदर आणि गिर्दोळीला कोळसा हब होण्यापासून रोखण्याची शपथही त्यांनी घेतली आहे.
वेळ्ळीचे उमेदवार प्रुझ सिल्वा यांनी मतदारसंघातील बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी उद्योजकता आणि रोजगारभिमुख केंदे स्थापन करणे, नागरिकांना इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावात मोफत आणि जलद वाय-फाय नेटवर्क तयार करण्याची योजना जाहीर केली आहे.









