राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांचे क्रांतिदिन कार्यक्रमात उद्गार
प्रतिनिधी /मडगाव
डॉ. राम मनोहर लोहिया, डॉ. ज्युलियो मिनेझिस आणि अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य पणाला लावले. स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्याची स्वतंत्र ओळख राखण्यास्प् प्राधान्य दिले आणि त्यासाठी संघर्ष केला. त्यांनी पाहिलेली स्वतंत्र आणि स्वाभिमानी गोव्याची स्वप्ने पूर्ण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यामुळेच 2022 मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेस पक्ष गोव्याच्या अस्मितेला आणि पर्यावरणाला हानी पोहोचविणारे सगळे प्रकल्प रद्द करेल, असे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी मडगावातील लोहिया मैदानावर स्पष्ट केले.
75 व्या गोवा क्रांतिदिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने मडगाव येथील लोहिया मैदानावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हुतात्मा स्मारक व डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या पुतळय़ाला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. त्यांच्या हस्ते ज्ये÷ स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर आणि गोपाळ चितारी यांचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, माजी मंत्री आलेक्स सिकेरा, मडगावच्या उपनगराध्यक्षा दिपाली नाईक, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष एम. के. शेख, आल्तिनो गोम्स, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा बीना नाईक, दक्षिण गोवा काँग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, मडगाव गट अध्यक्ष गोपाळ नाईक, प्रियोळ विभाग अध्यक्ष हेमंत नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. माजी नगरसेवक अविनाश शिरोडकर यांनी सर्वांचे स्वागत केले आणि आभार मानले.
क्रांतिदिनाच्या या ऐतिहासिक दिवशी आम्ही गोमंतकीयांचा आवाज म्हणून सदैव काम करत राहू अशी प्रतिज्ञा करत आहोत. राज्याची समृद्ध परंपरा, ओळख, अस्मिता जपण्यासाठी आणि समृद्धीसाठी आम्ही पक्ष म्हणून नेहमीच जबाबदारीने काम करू. काँग्रेस हा नेहमीच सर्वसामान्य गोमंतकीयांचा पक्ष राहिला आहे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखामध्ये आम्ही सोबत असतो. गोमंतकीय जनमताचा आदर करत आम्ही सेझ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आमचे सरकार हे जनसामान्यांचे सरकार असते. जनतेच्या प्रत्येक भावनेचा आम्ही यथोचित आदर करतो, असेही यावेळी राव यांनी नमूद केले.









