कोरोना व्हायरसची धास्ती पूर्ण जगाने घेतली आहे. त्याला गोवादेखील अपवाद नाही. गोव्यात सध्या कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही. त्यामुळे पर्यटन उद्योग पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने चर्चा होताना आढळून येत आहे.
खनिज व पर्यटन हे गोव्याचे दोन प्रमुख उद्योग. त्यात खनिज व्यवसाय बंद झालेला. थोडीफार आशा होती ती पर्यटन उद्योगावर. पण, कोविड-19 मुळे हा उद्योग संकटात सापडला आहे. जगभरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना कधी नियंत्रणात येईल हे सांगणे कठीण बनले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी खरा विनाश तर अजून दिसायचा आहे असे सांगत धोक्याचा इशारा दिला आहे. हा इशारा लक्षात घेता लोक पर्यटनासाठी बाहेर पडतील का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
कोरोनाचा प्रभाव अद्यापही कमी झाला नसताना अनेक देश निर्बंध शिथिल करत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी हा इशारा दिला आहे. टेड्रोस यांनी जगभरात जवळपास 1 लाख 66 हजारांहून जास्त जणांचा बळी घेणाऱया कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव का वाढेल याचे कोणतेही ठाम कारण सांगितले नाही. हे संकट रोखायला हवे. हा एक व्हायरस आहे जो अद्यापही अनेक लोकांना समजलेला नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
या व्हायरसची धास्ती पूर्ण जगाने घेतली आहे. त्याला गोवादेखील अपवाद नाही. गोव्यात सध्या कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही. त्यामुळे पर्यटन उद्योग पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने चर्चा होताना आढळून येत आहे. गोव्याचा पर्यटन व्यवसाय हा देशी पर्यटकांपेक्षा विदेशी पर्यटकांवर जास्त अवलंबून आहे. विदेशातून दरवर्षी मोठय़ा संख्येने पर्यटक गोव्याला भेट देतात. विदेशी चलनामुळे हे पर्यटक नेहमीच महत्त्वाचे गणले गेले आहेत. मात्र, सध्या अमेरिका, इटली, स्पेन, चीन, जर्मनी, इराण, फ्रान्स, ब्रिटन, बेल्जियम, नेदरलँड, ऑस्ट्रिया, कॅनडा, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, इस्रायल, रशिया, ब्राझील, जपान इत्यादी देशांतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता या देशातील नागरिक पर्यटनासाठी गोव्यात आले तर आम्ही त्यांना स्वीकारणार का असा सवालही आता उपस्थित झालेला आहे.
लॉकडाऊन संपल्यानंतर आणि कोरोना व्हायरसची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच गोव्यातील पर्यटन उद्योग पुन्हा सुरू होऊ शकेल असे मत पर्यटन उद्योगाशी संबंधित असलेल्या व्यक्ती व्यक्त करतात. अनेक देशांनी कोरोना व्हायरसचे गांभीर्य व लॉकडाऊनचे महत्त्व ओळखले नाही. त्या देशांना जबर किंमत मोजावी लागली. कोरोना व्हायरसची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल का, याचे ठोस उत्तर कोणीच देऊ शकत नाही. उद्या पर्यटक आले नाहीत तर या उद्योगावर अवलंबून असलेल्यांची परिस्थिती काय होईल, याचा विचार करणेदेखील कठीण आहे.
गोवा हा नयनरम्य समुद्री किनाऱयांसाठी प्रसिद्ध व जगभरात त्याची ख्याती आहे. किनारपट्टी भागाचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत हे पर्यटकच आहेत. अनेक हॉटेल्स, शॅक्स, टुरिस्ट टॅक्सीचालक, किनारपट्टी भागातील दुकानदार हे पर्यटनावर अवलंबून असतात. उद्या खनिज व्यवसायासारखी पर्यटन उद्योगाची परिस्थिती झाली तर गोव्याला सावरणे कठीण जाणार आहे.
सध्या कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने पर्यटन उद्योग सुरू करण्याची चर्चा होत असली तरी लॉकडाऊन संपल्यानंतरही ताबडतोब आपल्या सीमारेषा उघडण्याचा विचार करू शकत नाही. हेल्थ प्रोटोकॉलचे पालन केल्यावरच पर्यटन उद्योग सुरू होईल हे निश्चित केले पाहिजे. विनाकारण घाई करणे योग्य ठरणार नाही. या वर्षाचे जवळपास तीन महिने कोविड-19 मुळे पर्यटन उद्योग ठप्प झाला. मे महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल. त्यावेळी गोव्यातील पर्यटन व्यवसाय जवळपास पूर्णपणे बंद असतो. कोरोना व्हायरसमुळे गोव्यात आलेल्या सर्व विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवून दिले आहे. त्यामुळे गोव्यात पर्यटक शिल्लक नाहीत. तसेच अनेक हॉटेल्स ही कोविड-19 साठी आरक्षित करण्यात आलेली आहेत.
आत्ता सर्वांना प्रतीक्षा आहे, ती नव्या पर्यटन हंगामाची. तोपर्यंत कोरोना व्हायरस नियंत्रणात आला तर ठीक अन्यथा या उद्योगावर अवलंबून असलेल्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता नाकारली जात नाही. पर्यटन व्यवसायावर गेल्या अनेक वर्षांपासून असंख्य कुटुंबे अवलंबून आहेत. त्यांची आर्थिक घडी उद्ध्वस्त होण्याचा धोका कोरोना व्हायरसमुळे निर्माण झाला आहे. कोरोनाने केवळ पर्यटन क्षेत्रच नव्हे तर इतर अनेक व्यवसायासमोर संकट निर्माण केले आहे. जेवढय़ा लवकर तो नियंत्रणात येईल त्यातच सर्वांचे हित आहे.
सर्व काही सुरळीत झाले आणि एकदा गोवा सरकारने पर्यटन उद्योग पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली की, प्रचंड खबरदारी घ्यावी लागणार आहे. राज्यात प्रवेश करणाऱया सर्वांची विमानतळ, रेल्वे स्थानके आणि इतर सर्व प्रवेशद्वारांवर तपासणी करावी लागणार आहे. जेव्हा त्यांना कोरोना व्हायरससाठी नकारात्मक म्हणून प्रमाणित केले जाईल, त्यानंतरच त्यांना राज्यात प्रवेश करण्याची परवानगी देणे योग्य ठरणार आहे. गोव्याच्या पर्यटन उद्योगाचे यापुढचे भवितव्य हे केवळ कोरोना व्हायरसच्या नियंत्रणावर अवलंबून आहे. हा व्हायरस नियंत्रणात यावा म्हणून सध्या संपूर्ण जगाची धडपड सुरू आहे. अमेरिकेसारख्या महाशक्ती असलेल्या देशाला जबरदस्त दणका दिला आहे. आपल्या देशाने 15 हजारांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे देशी पर्यटकही पर्यटनाला येतील की नाही हे येणारा काळ ठरविणार आहे. एकूण पर्यटन उद्योगावर संकट उभे ठाकले आहे हे कोणी नाकारू शकणार नाही.
महेश कोनेकर








