सामाजिक आंदोलनांत सहभागी झालेल्या महिलांनी चर्चासत्रात व्यक्त केलेले मत
प्रतिनिधी / फातोर्डा
आमचा सुंदर, सुशोभित गोवा राखून ठेवण्यासाठी सर्वांनी खास करून तरुण पिढीने एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे असे मत सामाजिक आंदोलनांत सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केले. कोकणी भाषा मंडळाच्या चित्रंगीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर मेळावली आंदोलनाच्या प्रमुख पूजा मेळेकर, उन्नती मेळेकर, यूथ आर द नाऊ या संस्थेच्या प्रमुख निकोला पेरेरा, कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषा सिंगबाळ, समारोप सोहळय़ाच्या प्रमुख पाहुण्या प्रशांती तळपणकर, चर्चासत्राच्या संयोजिका व सामाजिक कार्यकर्त्या नमन धावस्कर व संयोजक पुरुषोत्तम वेर्लेकर उपस्थित होते.
आमचे वर्तमान सुरक्षित नसेल, तर भविष्याची चिंता करून काय फायदा. आमचा गाव, झाडे-वेली जर नष्ट होत असतील, तर आम्ही गप्प कसे राहू शकतो, असे प्रश्न पूजा मेळेकर यांनी केला. मेळावलीच्या सगळय़ा महिला नऊ महिने रस्त्यावर उतरल्या होत्या. ही सोपी गोष्ट नव्हती. पोलिसांचे अत्याचार सहन करूनही आम्ही मागे फिरलो नाही, असे काही अनुभव कथन करून त्यांनी सांगितले.
घरून प्रोत्साहन मिळाले
मेळावली आंदोलनाचा धावता आढावा घेताना उन्नती मेळेकर यांनी सांगितले की, या आंदोलनात सक्रिय नसलेल्या सरकारी कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या. गावातील लोकांना फसवून चोरून जमिनीची मोजणी करण्यात आली. आंदोलन हाणून पाडण्यासाठी बेकायदेशीरपणे अश्रुधुराचा वापर करण्यात आला. अशा अनेक अडचणी येऊनही आम्हाला घरून प्रोत्साहन दिले गेले. मुली म्हणून कधीच नकार मिळाला नाही, असे त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना निकोला पेरेरा यांनी मोले आंदोलन आणि तीन प्रकल्पांच्या विरोधातील आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. हे सर्व प्रकल्प एकत्र तयार झाले, तर ?काय होईल, सध्या काय स्थिती आहे याचे अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी केले. तरुण भ्रष्टाचारी नाही. अभ्यासपूर्णरीत्या तो आंदोलनात सहभागी होतो. त्यामुळे सरकार तरुण पिढीला घाबरते, असेही त्या म्हणाल्या.
विषयाचे ज्ञान हवे
कुठेही संघर्ष किंवा प्रतिकार करण्यासाठी त्या विषयाचे ज्ञान असणे गरजेचे असते. हे ज्ञान असल्यानेच आजचा समाजकार्यकर्ता योग्यरीतीने आपली मते मांडू शकतो. त्याशिवाय महिला आता प्रत्येक टप्प्यावर आपली मते व बुद्धी वापरतात. ?हा महत्त्वाचा बदल आहे?. महिलांनी नोकरी किंवा आंदोलनासाठी घराबाहेर पडताना घरातील जबाबदाऱया घरातील इतरांच्या सुद्धा आहेत हे लक्षात घेऊन घरच्यांना त्या प्रकारे तयार केले पाहिजे, असे मत समारोप सोहळय़ात बोलताना तळपणकर यांनी मांडले. सिंगबाळ यांनी स्वागत केले.









