सिंधुदुर्गवासीय चिंतेत : पंतप्रधान जीवनदायी योजना सुरू : महात्मा फुले जीवनदायी योजना तात्पुरती बंद
मयुर चराटकर / बांदा:
सिंधुदुर्ग जिह्यातील जनतेच्या आरोग्याचा कणा असलेल्या गोवा-बांबोळी रुग्णालयातील महात्मा फुले जीवनदायी योजना एप्रिलपासून बंद झाल्याने उपचारासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. गोवा सरकारने या योजनेबाबत योग्य कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ही सेवा तात्पुरत्या स्वरुपात बंद झाली आहे.
वर्षानुवर्षे सुरू असलेली मोफत आरोग्य सुविधा एक जानेवारी 2018 पासून बंद करून गोवा सरकारने शुल्क आकारणी सुरू केली होती. याबाबत ‘तरुण भारत’ने वाचा फोडल्यानंतर जिल्हाभरात पडसाद उमटले. दोडामार्ग तालुक्यात याबाबत जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आले होते. त्याचे फलित म्हणून ही योजना लागू करण्यात आली होती. आता गोवा सरकारकडून प्रस्तावावर सही न केल्याने .या योजनेत खंड पडला आहे.
सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा नेहमीच व्हेंटिलेटरवर राहिली आहे. येथील राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सुरुवातीपासूनच येथील आरोग्य यंत्रणेबाबत कोणीच गंभीर नसल्याचे दिसून येते. कधी यंत्रणा नाही, तर कधी डॉक्टर नाहीत, असे विदारक चित्र गेली कित्येक वर्षे आहे. त्यामुळे कोणत्याही छोटय़ा-मोठय़ा आजारालाही येथील वैद्यकीय अधिकारी बांबोळीला जाण्याचा सल्ला देतात. गोवा बांबोळी येथील वैद्यकीय अधिकारीदेखील प्रत्येक रुग्णावर कोणताच दुजाभाव न करता उपचार करतात. 2017 च्या अखेरीस तेथील आरोग्य यंत्रणेवर येणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोव्याबाहेरील रुग्णांना सशुल्क सेवा देण्याचे जाहीर केले होते. गोवास्थित रुग्णांसाठी दीनदयाळ स्वास्थ्य योजना लागू करून त्यांना उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर 1 जानेवारी 2018 पासून बिगर गोमंतकीय रुग्णांना सशुल्क सेवा देण्याचे ठरविण्यात आले. तरीही गोवा सरकारने माणुसकीचा धर्म दाखवत काही अत्यावश्यक रुग्णांना आवश्यकतेनुसार सेवा मोफत दिली होती.
गोव्यातील सशुल्क उपचारांबाबत ‘तरुण भारत’ने आवाज उठविल्यानंतर जिह्यातील लोकप्रतिनिधींनी गोवा सरकारशी चर्चा सुरू केली. दोडामार्गवासीयांनी जिल्हास्तरीय जनआक्रोश आंदोलन छेडले. त्यावेळी अनेकांनी केलेली शिष्टाई फोल ठरली होती. तर सावंतवाडीचे जीवनरक्षा ट्रस्टचे राजू मसुरकर यांनी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासोबत चर्चा करून महात्मा फुले जीवनदायी योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते.
31 मार्चला मुदत संपली
आता महात्मा फुले जीवनदायी योजनेची मुदत 31 मार्चला संपली असून त्या ठिकाणी कार्यरत इन्शुरन्स कंपनीचा ठेकाही संपला आहे. सद्यस्थितीत कंपनी बदलण्यात आली असून महाराष्ट्र शासनाकडून त्याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. तर त्यातील नियमात काही प्रमाणात बदल झाल्याने गोवा शासनाच्यावतीने त्यावर स्वाक्षरी झाली नाही. परिणामी तेथे उपचारासाठी पैसे मोजावे लागत आहेत.
ठेका दुसऱया कंपनीकडे
महात्मा फुले जीवनदायी योजना 13 फेब्रुवारी 2019 साली सुरू झाली. महाराष्ट्रात या योजनेचा ठेका दुसऱया कंपनीने घेतल्याने गोवा सरकारने तो पास केलेला नाही. तर सद्यस्थितीत त्या ठिकाणी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू आहे. ही योजना 2019 पासुन सुरू झाली. मात्र, ठराविक रेशनकार्डधारकांना ती लागू आहे.
लोकप्रतिनिधी करतात काय?
सध्या जगभरात ‘कोरोना’चे संकट गडद होत असताना सद्यस्थितीत सिंधुदुर्ग सुरक्षित आहे. ‘कोरोना’ची लागण होऊ नये, यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक काम करत आहेत. मात्र. गोव्यातील सुविधा बंद होईपर्यंत लोकप्रतिनिधी काय करत होते, असा सवाल उपस्थित होत आहे. आपल्या जिह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने तोपर्यंत तरी गोव्यात मोफत उपचार मिळण्यासाठी प्रयत्न हाणे आवश्यक आहे.









