लिव्हरपूल संघाच्या 129 वर्षांच्या इतिहासातील पहिलीच घटना
हॉथोर्न्स / वृत्तसंस्था
प्रतिस्पर्ध्यांचे हल्ले थोपवणे, ते पूर्ण ताकदीनिशी परतावून लावणे, ही गोलरक्षकाची मुख्य जबाबदारी. मात्र, तोच गोलरक्षक प्रतिस्पर्ध्यांच्या बॉक्समध्ये घुसून गोलही करत असेल तर त्या संघाचा आनंद आसंमतात गुंजला नाही तरच नवल!
सध्या सुरु असलेल्या इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीग स्पर्धेत लिव्हरपूलने हाच आनंद रविवारी अनुभवला. या संघाचा गोलरक्षक ऍलिसन बेकरने स्टॉपेज टाईममध्ये 95 व्या मिनिटाला आपल्या जागेपासून 80 मीटर्स अंतरावर प्रतिस्पर्ध्यांच्या बॉक्समध्ये, पेनल्टी एरियात धडक मारली आणि कॉर्नरवर मिळालेल्या पासवर चक्क हेडर लगावत केलेल्या गोलसह नवा इतिहास रचला. हा गोल झाला, त्यावेळी वेस्ट ब्रॉम संघाचा गोलरक्षक ऍल्बविन देखील अक्षरशः थक्क झाला. लिव्हरपूल संघाच्या 129 वर्षांच्या इतिहासात एखाद्या गोलरक्षकाने गोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
लिव्हरपूल-वेस्ट ब्रॉम लढतीत हा चमत्कार प्रत्यक्षात साकारला गेला. उभय संघात यावेळी स्टॉपेज टाईमपर्यंत 1-1 अशी बरोबरी होती. त्याचवेळी 95 व्या मिनिटाला ट्रेंट अलेक्झांडर-ऍरनॉल्डच्या कॉर्नरवर बेकरने हेडर लगावत गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. लिव्हरपूलने या चमत्काराचे विविध अँगलमधील काही व्हीडिओ आपल्या सोशल नेटवर्कवर शेअर केले.
या विजयासह लिव्हरपूल संघासाठी हंगामातील शेवटच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या आशाअपेक्षा उंचावल्या आहेत. लिव्हरपूल चेल्सीपेक्षा एका गुणाने पिछाडीवर पाचव्या स्थानी असून चेल्सीचा संघ चौथ्या स्थानी आहे. टेबलटॉपर्स मँचेस्टर सिटीने प्रीमियर लीग जेतेपदावर यापूर्वीच शिक्कामोर्तब केले आहे. आतापर्यंत 36 गुणांची कमाई करणाऱया लिव्हरपूलने आता बर्नली व क्रिस्टल पॅलेसविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांना पहिल्या चारमध्ये कायम राहून चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र ठरता येईल.
मूळ ब्राझिलियन असलेल्या ऍलिसन बेकरच्या वडिलांचे फेब्रुवारीमध्ये निधन झाले असून या लढतीत गोलरक्षक असूनही गोल करण्याचा पराक्रम गाजवल्यानंतर तो काही क्षण भावूक झाला. ‘मागील काही महिन्यात जे-जे घडले, ते वेदनादायी होते. पण, फुटबॉल हेच माझे आयुष्य आहे. मी खेळत असायचो, त्यावेळी माझे वडील अगदी खुश असायचे. आताही मला खात्री आहे की, ते माझा खेळ पाहत असतील’, असे भावूक उद्गार त्याने येथे काढले.
‘मार्कर’ नव्हता अन् ऍलिसन बेकरने याच संधीचे सोने केले!
एरवी, प्रत्येक संघातील फॉरवर्ड, मिडफिल्डर व डिफेंडरसाठी प्रतिस्पर्धी संघाचे देखील तोडीस तोड पर्याय असतात. हे खेळाडू प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याच्या मोहिमेवर असतात आणि यासाठी त्यांना मार्कर असे उल्लेखले जाते. रविवारी या लढतीत वेस्ट ब्रॉम संघातील खेळाडू लिव्हरपूलच्या प्रत्येक स्ट्रायकरला रोखण्यासाठी मार्करच्या भूमिकेत तैनात होते. पण, याचवेळी संरक्षण करण्याचा आपला गोलपोस्ट सोडून इथे प्रतिस्पर्ध्यांच्या बॉक्समध्ये आलेल्या ऍलिसन बेकरला कोणीच मार्क केले नव्हते. याचाच लाभ घेत अलेक्झांडरच्या कॉर्नरवर योग्यवेळी हवेत झेपावत बेकरने अप्रतिम हेडर लगावत गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला आणि येथे नवा इतिहास रचला गेला!
इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये गोल करणारे गोलरक्षक
गोलरक्षक / संघ / प्रतिस्पर्धी / वर्ष
पीटर शमिचेल / इव्हर्टन / ऍस्टॉन / ऑक्टोबर 2001
ब्रॅड प्रेडेल / चार्लटन / ब्लकबर्न / फेब्रुवारी 2004
पॉल रॉबिन्सन / टॉटेनहम / वॅटफोर्ड / मार्च 2007
टीम हॉवर्ड / इव्हर्टन / बोल्टन / जानेवारी 2012
ऍस्मिर बेगोव्हिक / स्टोक / साऊदम्प्टन / नोव्हेंबर 2013.









