भारताचे पहिलेवहिले विश्वचषक जेते माजी कर्णधार कपिलदेव यांचा रोखठोक सवाल
कोलकाता / वृत्तसंस्था
‘हार्दिक पंडय़ा भारतीय संघासाठी महत्त्वाचा फलंदाज आहे. मात्र, याचप्रमाणे त्याने सातत्याने गोलंदाजी करणे देखील आवश्यक आहे. जर तो गोलंदाज करत नसेल तर त्याला अष्टपैलू कसे म्हणायचे’, असा रोखठोक सवाल महान क्रिकेटपटू, माजी कर्णधार कपिलदेव यांनी उपस्थित केला. रॉयल कलकत्ता गोल्फ कोर्सवर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अलीकडेच संपन्न झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पंडय़ाने केवळ दोन सामन्यात गोलंदाजी केली. त्या स्पर्धेत नंतर भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. दुखापतीचे स्वरुप स्पष्ट न केल्याचा मुख्य ठपका पंडय़ावर आहे आणि याच कारणावरुन न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात संपन्न झालेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतून त्याला वगळले गेले. भारताने सदर मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. या पार्श्वभूमीवर कपिलदेव बोलत होते.
‘हार्दिक पंडय़ा आता दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे, त्याने सातत्याने गोलंदाजी करायला हवी. तो गोलंदाजी करत असेल तरच संघ अधिक समतोल, अधिक तुल्यबळ होईल’, याचा कपिलनी पुढे उल्लेख केला.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची प्रशिक्षणातील कारकीर्द सुपरहिट ठरेल, असा अंदाजही त्यांनी येथे वर्तवला. ‘राहुल द्रविड उत्तम व्यक्ती आहे आणि उत्तम क्रिकेटपटूही राहिला आहे. क्रिकेटपटू यापेक्षाही प्रशिक्षक म्हणून द्रविड लक्षवेधी योगदान देईल. याचे कारण म्हणजे क्रिकेटमध्ये त्याच्यासारखे योगदान देणे कोणालाही शक्य झालेले नाही’, असे कपिल येथे म्हणाले.
राहुल द्रविडने आपली कारकीर्द गाजवल्यानंतर बेंगळुरातील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद यशस्वीरित्या सांभाळले. शिवाय, 19 वर्षाखालील व अ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत असताना नवे खेळाडू घडवण्यात देखील सिंहाचा वाटा उचलला. आजच्या घडीला युवा खेळाडूंची मोठी फळी सुसज्ज झाली आहे, याचे श्रेय मुख्यत्वेकरुन राहुल द्रविडला दिले जाते.
कपिलनी यावेळी अश्विनची प्रशंसा केली. मात्र, जडेजाची गोलंदाजी पूर्वीइतकी धारदार होत नाही, असे निरीक्षण नोंदवले. ‘फलंदाज या नात्याने जडेजा प्रगल्भ झाला असला तरी तीच प्रगल्भता त्याच्या गोलंदाजीत आढळत नाही’, असे ते याप्रसंगी म्हणाले. ‘युवा खेळाडूने शतक झळकावले, याचा अर्थ खेळ योग्य दिशेने पुढे सरकत आहे’, असे त्यांनी श्रेयस अय्यरचे कौतुक करताना नमूद केले.









