वार्ताहर / माशेल
गोमंतक गौड मराठा समाज केंद्रीय समितीतर्फे स्व. यशवंत गावडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्व. यशवंत गावडे यांचे 15 एप्रिल रोजी निधन झाले होते. ते 84 वर्षाचे होते. अंत्रुजनगर वरचा बाजार फोंडा येथील संस्थेच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी समाजाचे अध्यक्ष विश्वास गावडे, उपाध्यक्ष सुर्यकांत गावडे, खजिनदार प्रकाश गावकर, मोलू वेळीप, नानू बांडोळकर, सतीश वेळीप, वासु बांडोळकर, पांडुरंग घाडी व समाजबांधव उपस्थित होते. अध्यक्ष विश्वास गावडे यांनी स्व. यशवंत यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला. इतर सदस्यांतर्फे पुष्पांजली वाहण्यात आली. त्यानंतर एक मिनिट स्तब्धता पाळत आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना विश्वास गावडे म्हणाले की स्व. यशवंत गावडे हे गौड मराठा समाजाचे संस्थापक सदस्य होते. समाजबांधवातील महिलांनी शिक्षण घ्यावे असे ते आवर्जुन सांगत होते. समाजाच्या सर्व कार्यक्रमात त्याची उपस्थिती असायची. युवकांना मार्गदर्शन करताना नेहमी एकसंघ राहून सरकाराकडे आपल्या मागण्यापुर्तीसाठी आवाज उठावण्यासाठी ते युवकांना परावृत्त करीत होते. त्यानी समितीचे अध्यक्षपद भूषविलेले असून राजकरण न करताही समाजकरण कसे करावे ही शिकवण त्यानी समाजबांधवानी दिली. स्व. यशवंत गावडे यांनी समाजासाठी दिलेले योगदान समाजबांधवांनी कधीही विसरू नये, त्याच्या स्मृती कायम स्मरणात ठेवाव्या असे आवाहन केले. यावेळी सुर्यकांत गावडे, नानू बांढोळकर यांनी स्व. यशवंत गावडे यांच्या कार्याची महती सांगितली.









