निवडणूक रणनितीबाबत प्राथमिक चर्चा
प्रतिनिधी / कोल्हापूर
गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणनिती निश्चित करण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सुमारे तासभर झालेल्या बैठकीमध्ये आगामी काळात निवडणूक होणाऱ्या जिह्यातील या दोन्ही दोन्ही शिखर संस्थांच्या निवडणुकामध्ये कोणती भूमिका घ्यायची याबाबत सविस्तर चर्चा झाली. नेत्यांच्या या बैठकांमुळे `गोकुळ’चा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे.
गोकुळ, केडीसीसीच्या निवडणुकीमध्ये आजतागायत घाटगे आणि आवाडे गटाने तटस्थ भूमिका घेतली होती. या दोन्ही गटाची सहकार क्षेत्रात वैयक्तीक ताकद आहे. त्यांच्या गटाचे स्वतंत्र ठराव असल्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये आपण कोणती भूमिका घ्यायची याबाबत त्यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा झाली. आगामी काळात आणखी बैठका घेऊन दोन्ही संस्थांच्या निवडणुकीबाबत भूमिका निश्चित केली जाणार असल्याचे घाटगे यांनी सांगितले. सत्ताधाऱयांना साथ द्यायची की विरोधकांना हात द्यायचा याबाबत मात्र आगामी काळातच निर्णय घेतला जाणार आहे.