संभाव्य मतदारसंघात भाजपने दिला उमेदवार
पटना
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन जदयूमध्ये प्रवेश करणाऱया बिहारच्या माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांची निराशा झाली. पांडे यांना जदयूने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, भाजपने दुसराच उमेदवार घोषित केल्याने पांडे यांची निराशा झाली.
गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र भाजपने तिथे एका बिहारच्या निवृत्त पोलीस हवालदाराला उमेदवारी दिली आहे. बक्सरमधील भाजपचे उमेदवार परशुराम चतुर्वेदी यांनी माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना मागे टाकत ही उमेदवारी मिळवली आहे अशी चर्चा सुरू आहे. “गुप्तेश्वर पांडे हे माझ्या मोठय़ा भावासारखे आहेत. मी त्यांच्या आदरपूर्वक पाया पडतो आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात आपुलकीशिवाय काहीच नाही’’ असे चतुर्वेदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.