मेक्सिकोत उग्र निदर्शने – 62 पोलिसांसह 81 महिला जखमी
वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
मेक्सिकोत महिलांच्या विरोधातील गुन्हय़ांप्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी निदर्शने झाली आहेत. ही निदर्शने महिलांनी केली आहेत. मेक्सिकोचे अध्यक्ष लोपेझ ओब्राडोर हे बलात्काराचा आरोपी असलेल्या नेत्याचा बचाव करत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे देशभरात संताप पसरला आहे. ओब्राडोर यांनी पदत्याग करावा या मागणीकरता महिलांनी अध्यक्ष भवनाला (नॅशनल पॅलेस) घेराव घालण्याचा प्रयत्न केला आहे.
सुरक्षा दलांनी रोखू नये याकरता महिलांनी लाइटर, छोटे गॅस सिलिंडर यासारख्या जाळपोळीच्या वस्तू, बॅट आणि हातोडे सोबत आणले होते. पोलिसांनी रोखताच या महिला भडकल्या आणि त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला आहे. पोलिसांनीही अश्रूधूराचा वापर केला आहे. या सर्व प्रकारात 62 पोलिसांह 81 महिला जखमी झाल्या आहेत.
प्रतिदिन 10 महिलांची हत्या
महिलांच्या विरोधात सर्वाधिक गुन्हे होणाऱया देशांमध्ये मेक्सिकोचा समावेश आहे. मागील वर्षी तेथे प्रतिदिन सरासरी 10 महिला मारल्या गेल्या आहेत. तर वर्षभरात 16 हजार महिलांवर बलात्कार झाले आहेत.
अमेरिकेची चिंता वाढली
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सत्ताग्रहण केल्यावर आणि स्थलांतरितांसाठी दरवाजे उघडण्याची घोषणा केल्यावर मेक्सिकोला लागून असलेल्या सीमेवर गर्दी होऊ लागली आहे. ट्रम्प यांचे धोरण रद्द केल्यावर पहिल्या टप्प्यात 25 हजार लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. पण ही यादी आतापर्यंत अंतिम स्वरुप घेऊ शकलेली नाही. दुसरीकडे मध्य अमेरिकन देशांमधून पळून आलेल्या लोकांची मुले सातत्याने घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. मागील दोन आठवडय़ात 3250 पेक्षा अधिक मुलांना पकडून ताबा केंद्रांमध्ये पाठविण्यात आले आहे. या केंद्रांवर मुलांना 3 दिवसांपर्यंतच ठेवता येते.









