मातीच्या भरावामुळे खोडापर्यंत पाणी पोचणे कठीण : काही माड यापुर्वीच पाण्याअभावी सुकले
संदीप शिंदे / पणजी

माणूस तसेच प्राण्यांपासून वृक्षानांही पाण्याची गरज भासते. या सर्वांना पाणी न मिळाल्यास त्यांना जीवनच जगणे कठीण होते. म्हापसा-गिरी-पणजी या नव्याने बांधलेल्या महामार्गावर उभारलेल्या फ्लायओव्हरच्या मधोमध अनेक माड आहेत. हे माड मध्यापर्यंत मातीत बजुजविण्यात आले असून त्यांच्या मुळांपर्यंत पाणी पोचत नसल्याने ते अखेरचा श्वास घेत आहेत. यातील चार ते पाच माड मरूनही गेले आहेत. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
गोव्यात मुंबई ते गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून अडथळा ठरणाऱया काही झाडांना हटविले आहे. परंतु म्हापसा ते पणजी दरम्यान गिरी येथे महामार्गाचे सौंदर्य खुलविणाऱया अनेक माडांना जीवदान देण्यात गोवा सरकारने यश मिळविल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले होते. अनेक वर्षांपासूनच्या या माडांचे जतन होणार असल्याने अनेकांनी सरकारला धन्यवाद दिले होते. मात्र या ठिकाणी फ्लायओव्हरसाठी माडांच्या बाजूला मातीचा मोठा भराव टाकण्यात आला. त्यामुळे काही माड मुळापासून अर्ध्याहून अधिक उंचीपर्यंत मातीच्या भरावात असल्याने त्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे हे माड पाण्याअभावी अखेरचा श्वास घेत आहेत काहींचा यापुर्वीच अंत झालेला आहे.
माडांमुळे महामार्गाच्या सौंदर्यात भर, पण…

गिरी येथे सुमारे अडीच किलोमीटर लांबीच्या या मार्गावर दुतर्फा सुमारे 250 हून अधिक माड एका रांगेत उभे आहेत. पूर्णपणे वाढ झालेले हे माड महामार्गाच्या सौंदर्यात भर घालत असून कडक उन्हातून प्रवास करणाऱया प्रवाशाना माडांच्या सावलीमुळे गारव्याचा आनंदही मिळत आहे. परंतु नवीन केलेल्या महामार्गाच्या मधोमध असलेल्या काही माडांची झावळे पाण्याअभावी सुकून गेली आहेत.
अर्धेअधिक माड गाडले मातीत
एनएच 17 महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी राज्यात अनेक ठिकाणी महामार्गाला अडथळा ठरणारी झाडे हटविण्यात आली आहेत. म्हापसा ते पणजी मार्गावरील गिरी भागातून जाणारा मार्ग सहापदरी होणार आहे. हे माड महामार्गासाठी कापले जातील या भीतीने अनेकांनी या विरोधात आवाज उठविला होता. याची सरकारने दखल घेऊन हे माड वाचविले होते. मात्र एका बाजूचे अनेक माड कापले तर काही तसेच ठेवण्यात आले आहेत. यातील अनेक माड मातीत अर्धेअधिक गाडले गेल्याने त्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.
कापलेल्या माडांच्या बाजूला कवाथ्यांची लागवड
महामार्गाला अडथळा ठरणारे माड कापल्यानंतर त्याच्या बाजूलाच अनेक ठिकाणी कवाथ्यांची लागवड करण्यात आली आहे. परंतु त्यांनाही पाणी मिळत नसल्याने त्यांची व्यवस्थित वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे.
आताच पाण्याची व्यवस्था आवश्यक
महामार्गावरील प्लायओव्हरच्या उंचीपासून जमिनीपर्यंतच्या उंचीपर्यंत सुमारे 30 ते 40 माडांना मातीचा भराव घातला आहे. त्यामुळे फ्लायओव्हरच्या मधोमध असलेले अनेक माड माणसाच्या उंचीपर्यंत आले आहेत. या माडांना सध्या पाणी मिळत नसल्याने ते अखेरचा श्वास घेत आहेत. काही माडांचा नायनाटही झाला आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू असून अद्याप पावसाळय़ाला एक ते दीड महिना बाकी आहे. त्यामुळे या महामार्गावरील माडांना आताच पाण्याची व्यवस्था न केल्यास ते मरून जातील, अशी भीती व्यक्त होत आहे. हे माड जगल्यास महामार्गाच्या सौंदर्यात भर पडणार आहे.









