कामगार हतबल : नवोदयच्या विद्यार्थ्यांना घेऊन आज बस
उत्तरप्रदेशात निघणार
विद्यालय प्रशासनाने भरले एसटीकडे साडेतीन लाख रुपये
वार्ताहर / सावंतवाडी:
परराज्यात जाण्याची परवानगी शासनाने दिल्यानंतर सांगेली नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांची बॅच सावंतवाडी येथून शिवशाही बसने सोमवारी रात्री निघणार आहे. उत्तर प्रदेशातील 21 विद्यार्थी व चार शिक्षकांना सावंतवाडी एसटी आगारातून शिवशाही बसने जाण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये नवोदय विद्यालय प्रशासनाला मोजावे लागले आहेत. दरम्यान, परराज्यात एसटीने जाण्यासाठी लाखो रुपये भाडे एसटीला द्यावे लागत असल्याने कामगार हतबल झाले आहेत. आम्हाला परवानगी द्या. आम्ही चालत गावी जाऊ, अशी विनवणी ते करत आहेत.
‘लॉकडाऊन’ काळात उत्तर प्रदेशातील या विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी रेल्वेचे बुकिंग दोनवेळा करूनही रद्द करण्याची वेळ आली होती. दोन मे रोजी रेल्वेचे बुकिंग करण्यात आले होते. मात्र, सध्या लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविल्याने आणि रेल्वे बंद असल्याने उत्तर प्रदेशमध्ये जाण्यासाठी त्यांना शिवशाहीचा आधार आहे. तर बिहारमधील 22 विटा कामगारांना एसटीने जाण्यासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च येणार असल्याने त्यांच्या ठेकेदाराने त्यांना गावी पाठविण्याचा निर्णय रद्द केला आहे.
कामगारांची निराशा
सध्या बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश, विजापूर-कर्नाटक या भागातील परप्रांतीय कामगारांना जाण्यासाठी एसटी बसचाच आधार आहे. परंतु एसटी बसचा राज्य परवाना खर्च जादा असल्याने या कामगारांना एसटीचे भाडे परवडणारे नाही. त्यामुळे त्यांची जाण्याची गैरसोय होत आहे. गावी जायची परवानगी शासनाने दिली. मात्र, जायचे तर भाडय़ासाठी चौपट दर द्यावा लागत असल्याने परप्रांतीय कामगारांचा हिरमोड झाला आहे. सोमवारी सावंतवाडी नगरपालिकेत तसेच तहसील कार्यालयात बिहार व अन्य भागातील शेकडो कामगारांनी गावी जाण्यासाठी परवान्यासाठी गर्दी केली होती. यावेळी सदर कामगारांनी आम्हाला गावी जायची परवानगी द्या. आम्ही चालत जाऊ, असे स्पष्ट केले.
सांगेली नवोदय विद्यालयात उत्तरप्रदेशातील 21 विद्यार्थी होते. मार्च महिन्यात विद्यालय बंद करण्यात आले होते. मार्चच्या दुसऱया आठवडय़ात या विद्यार्थ्यांनी रेल्वेचे तिकीट काढले होते. मात्र, रेल्वे बंद झाल्यामुळे ते अडकले. त्यानंतर दोन मे रोजी रेल्वेचे बुकिंग करण्यात आले. मात्र, केंद्र सरकारने 17 मेपर्यंत संचारबंदी वाढवल्याने मुलांचे उत्तर प्रदेशमध्ये जाण्याचे हाल झाले.
दोन चालक, एक मेकॅनिक
नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्रीजीतबाबू यांनी विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून परवानगी घेतली. त्यानुसार सावंतवाडी एसटी आगारातून शिवशाही बस सोमवारी रात्री एकच्या सुमारास विद्यालयातील सात मुली, 14 मुलगे आणि चार शिक्षकांना घेऊन निघणार आहे. या बससोबत दोन चालक, एक मेकॅनिक दिला जाणार आहे. जिल्हय़ातून उत्तर प्रदेशात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही पहिलीच बस आहे. यासाठी विद्यालयाने एसटी महामंडळाला 3 लाख 20 हजार रुपये डिपॉझिट भरले आहे. तर डिझेलसाठी 40 हजार व परमिटची रक्कम प्रशासनाला भरावी लागली आहे.
प्राचार्य श्रीजीतबाबू यांनी सांगितले की, विद्यालय प्रशासनाच्या खर्चाने मुलांना गावी पाठविण्यात येत आहे. उत्तरप्रदेशात जाण्यासाठी 33 तास लागणार आहेत. या कालावधीत या विद्यार्थ्यांना वाटेतील विद्यालयात काही काळ विश्रांती देऊन त्यांच्या गावी पोहोचविले जाणार आहे. सोमवारी रात्री झेंडा दाखवून बस सोडण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी सांगितले.
सावंतवाडी एसटी आगारप्रमुख मोहनदास खराडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना दुसऱया राज्यात घेऊन जाणारी ही पहिलीच बस आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात अंतर्गत एसटी सेवा येत्या दोन दिवसांत सुरू करण्याच्या दृष्टीने चालक-वाहकांना अलर्ट करण्यात आले आहे.
दहापट अधिक भाडे
केंद्र सरकारने परराज्यातील व परजिल्हय़ातील कामगारांना आपापल्या गावी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यांचा गावी जाण्याचा मार्ग सुकर झाला असला तरी महाराष्ट्रातून अन्य राज्यात जाण्यासाठी त्यांना आता एसटीच आधार ठरत आहे. परंतु अन्य राज्यात बदली परमिटचा खर्च अधिक असल्याने त्यांना दहापटीने अधिक रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे कामगार चिंतेत सापडले आहेत. एकीकडे येथे राहून हाताला काम नाही. राहण्याची सोय नाही. त्यामुळे गावी जाण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरलेला नाही. त्यामुळे हतबल झालेले कामगार आता आम्हाला येथून जायची परवानगी द्या. आम्ही चालतही जाऊ, अशी विनवणी प्रशासनाला करत आहेत.









