वार्ताहर / राजापूर
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरूवारी राजापूर तालुक्यातील वडवली-तेलीवाडी येथील प्रणिल बळीराम चव्हाण याच्या घरावर छापा टाकत विनापरवाना गावठी सिंगल बॅरल बंदुक व 13 काडतुसे जप्त केली आहेत.
बंदुकीतून सुटलेले गोळी लागून राजापूर तालुक्यातील नवेदर येथे एकाचा मृत्यू तर वाटूळ येथे एकजण गंभीर जखमी झाला होता. दापोली तालुक्यातही अशी घटना घडली होती. अशा प्रकारे बेकायदेशीर व विनापरवाना अग्नी शस्त्रांच्या वापरामुळे जीवितहानी होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगणाऱयांविरूध्द कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने रविवारी संगमेश्वर येथे कारवाई करताना एक सिंगल बॅरल ठासणीची विनापरवाना बंदुक जप्त केली होती. त्यानंतर राजापूर तालुक्यातील वडवली-तेलीवाडी येथे अशाच प्रकारे विनापरवाना गावठी बंदुक असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने वडवली-तेलीवाडी येथील प्रणिल बळीराम चव्हाण याच्या घरी छापा टाकला असता एक सिंगल बॅरल बंदुक व 13 काडतुसे जप्त केली. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार सुभाष भागणे, संजय जाधव, शांताराम झोरे, मिलिंद कदम, अरूण चाळके, बाळू पालकर आणि पोलीस नाईक अमोल भोसले यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी अमोल भोसले यांच्या फिर्यादीवर राजापूर पोलिसांनी प्रणिल चव्हाण याच्याविरोधात कलम 3/25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. प्रणिल चव्हाण याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे करीत आहेत.
रत्नागिरी जिल्हय़ात विनापरवाना बंदुक बाळगणाऱया लोकांची माहिती असल्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे द्यावी. माहिती देणाऱया व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.









