उचगांव / वार्ताहर
गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या व मारामारीच्या घटनेत वाढ झाली असुन परिसरात भितीचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.
दिवाळी सणात सरनोबतवाडी येथे तीन मोठया घरफोड्या झाल्या त्याचा काहीही मागमूस लागला नाही तोपर्यंतच करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील दोन बंद घरे फोडून सुमारे बासष्ट हजाराची चोरी झाली. उचगांव बाबानगर परिसरात चार बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली मात्र तेथे काही मुद्देमाल मिळाला नाही. एकूण एकसष्ट हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल व रोकड चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे.
गांधीनगर येथील एका नावाजलेल्या दुकानातील गोडावून मध्ये एक लाखाचा मुद्देमाल कामगारांनी लंपास केला. किरकोळ कारणावरुन मारामारीची प्रकरणे दररोज घडत आहेत. अनिल विधाणी याला भाटिया बंधू यांनी झार्याने मारहाण केली. तर वळिवडे येथे गोळे बंधूनी शेतीच्या कारणावरुन एकाला काठीने व लाठीबुक्क्ंयानी मारहाण केली. चारचाकी गाडी व दुचाकी गाड्यांच्या चोरीच्या घटनेतही वाढ झाली आहे.
याबरोबरच खंडणीबहाद्दरांचाही सुळसुळाट गांधीनगर परिसरात झाला आहे.खुलेआम गुटखा,अवैध गावठी दारु,बेटिंग,गोवा बनावटीची दारु वाहतूक असे अवैध धंदे परिसरात जोरात असताना दुसरीकडे चोरी, मारामारी, खंडणी यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनीच आत्ता लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.