वार्ताहर/ खडकलाट
गळतगा (ता.चिक्कोडी) येथील तक्षशिला बौद्ध विहारात शनिवारी राष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी तक्षशिला बौद्ध विहाराचे भंते गुरु धम्मो यांनी 7 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो याची माहिती दिली.
राष्ट्रीय विद्यार्थी दिनाचे महत्त्व सांगताना भंते गुरुधम्मो म्हणाले, सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी या हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला. डॉ. आंबेडकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या शाळेमध्ये शिक्षण घेऊन भारतीय घटनेचे शिल्पकार झाले. तेंव्हा या महान विद्वान पंडितांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासन 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तेव्हा या दिवसाचे महत्त्व समजून आजच्या युवकांनी शिकून मोठे होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास गळतगा येथील उपासक व उपासिका मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









