वार्ताहर/ खडकलाट
गळतगा येथील रामनगर परिसरातील एका 67 वषीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. त्यानुसार आरोग्य खात्याच्या अधिकारी श्रीदेवी शल्यागोळा, सहाय्यक मुरळी कुलकर्णी, बेडकिहाळ सर्कल अधिकारी एस. एम. नेमनावर, तलाठी, पीडीओ ए. वाय. कोल्लूर, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष श्रीकांत बन्ने, सदलगा पोलीस उपनिरीक्षक आर. वाय. बिळगी यांनी ती महिला राहत असलेला परिसर सीलडाऊन केला.
सदर महिलेला किडनीवरील उपचारासाठी गुरुवारी निपाणी येथील एका दवाखान्यामध्ये दाखविण्यात आले होते. त्यानंतर सदर महिलेला पुन्हा शुक्रवारी चिकोडी येथील दवाखान्यात दाखवून डायलेसिससाठी बेळगाव येथील केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथे या महिलेची रॅपिड कोरोना टेस्ट केली असता, त्यात तिचा पॉझिटिव्ह अहवाल आला. त्यामुळे सदर महिलेला बिम्समध्ये भरती करण्यात आले. उपचारदरम्यान शनिवारी पहाटे या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या संपर्कात 12 जण आल्याची माहिती मिळाली आहे.









