कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ सातारा
येथील जिल्हा रुग्णालयात गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान कोरोनामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्या. तोच शुक्रवारी सकाळी तिच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालत डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी आरोप फेटाळून लावत नातेवाईकांना वस्तुस्थिती सांगितली.
याबाबत जिल्हा रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील 21 वर्षीय गर्भवती महिला 30 ऑक्टोंबर रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. तिला थंडी, ताप अशी लक्षणे होती. ती महिला गर्भवती असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दरम्यान, तिची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. गुरुवारी सकाळपासूनच तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला व्हेंटिलेटर लावण्यात आला. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्या महिलेच्या नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात येऊन डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असा आरोप केल्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शेवटच्या क्षणी डॉक्टरांनी तिला पुण्याला नेण्यास सांगितले असा आरोपही नातेवाईकांनी केला.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर रुग्णालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी त्या महिलेच्या नातेवाईकांना आपल्या दालनात बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, संबंधित गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिच्यावर त्याप्रमाणे उपचार करण्यात येत होते. उपचारांमध्ये डॉक्टरांचा कोठेही हलगर्जपणा झाला नाही.








