वार्ताहर/ माखजन
संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील रेल्वे स्टेशनवर गणेश चतुर्थी दिवशी अवघे दहा प्रवाशी उतरल्यामुळे पुन्हा एकदा चाकरमान्यांनी रेल्वे कडे पाठ फिरवली असल्याचे चित्र समोर आले आहे. लांब पल्याचा प्रवासासाठी महत्व पूर्ण भूमिका बजावणारी बहुसंख्य सामान्य जणांचा आधारवड असलेली व संपूर्ण कोकण वाशियांची जीवन वाहिनी राहिलेली रेल्वे ऐन हंगामात रिकामी रुळावरून धावत असल्याने लाखों रुपयांचे आर्थिक नुकसान सद्या रेल्वेला सहन करावे लागत आहे.
गणेश चतुर्थी दिवशीच आरवली रेल्वे स्टेशन वर रात्री 2 ते पहाटे 7.50 पर्यंत थांबणाऱया रेल्वे गाडय़ातून अवघे दहा प्रवाशी उतरले असून त्यापैकी दोन महिला प्रवाशी उतरल्या आहेत. यामुळे नेमका फायदा रेल्वेला कसा होतोय हा प्रश्न सद्या निर्माण होत आहे. संपूर्ण रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट दिसत असून इथून जाणाऱयांची
संख्याही बोटावर मोजण्यासारखीच दिसत आहे. नेहमी रेल्वे स्टेशन वर लोकांचीसह रिक्षाची वर्दळ असायची. यावेळी मात्र अपवादानेच एखादी रिक्षा दिसत होती.
सरकारने ई-पासच्या माध्यमातून गणेश भक्तांना 21 दिवस अगोदर गावी जाण्याची परवानगी दिली यामुळे अनेकांनी खाजगी वाहनांनासह मिळेल त्या वाहनांना मोटय़ा प्रमाणावर भाडे देऊन गाव गाठले. मात्र त्यानंतर बस सेवेला परवानगी मिळताच बाकीचे चाकरमानी सामाजिक अंतर राखत व नादुरुस्त रस्त्यांचा व खड्डय़ांचा सामना करत लालपरीने प्रवास करत गावी आले. यानंतर सरकारने गणेश भक्तांसाठी रेल्वे सुरु केली मात्र प्रवाशांनी त्याकडे पाठ पूर्णतः पाठ फिरविल्यामुळे रेल्वेचे लाखो रुपये पाण्यात गेले रात्रभर आलेल्या रेल्वेतुन अवघे दहा प्रवाशी मुंबई, ठाणे, घाटकोपर आदी ठिकाणावरून आले आहे.
तसेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर गणपती उत्सव या वर्षी साधेपणाने करावे लागत आहे. यामुळे प्रवाशी संख्या कमी असल्याचे प्रवाशी वर्गातून सांगण्यात आले आहे.









