लॉकडाऊनमुळे माती आणण्यास समस्या : जूनपासून सुरू होते मूर्ती बनविण्याचे काम : गणेशोत्सव होणार साधेपणाने साजरा?
तेजस देसाई / दोडामार्ग:
चराचरात चैतन्य निर्माण करणारा तमाम कोकणवासियांचा सण म्हणजे गणेशोत्सव. यावर्षी कोरोनाच्या जागतिक संकटामुळे लॉकडाऊनच्या नियमांत अनेक सणही बंदिस्त झाले. गणेशोत्सव ऑगस्ट महिन्यात आल्यामुळे आतापासूनच मूर्तिकारांना तयारी करावी लागते. सध्यस्थितील लॉकडाऊनमुळे माती आणण्यासही समस्या निर्माण होत आहे. सध्याची कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची स्थिती पाहता कोकणवासीयांवर हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ऑगस्ट महिन्यात होणाऱया गणेश चतुर्थी सणाचे स्वरुप कसे असेल? हे प्रशासनाने लवकर जाहीर करणे आवश्यक आहे. कारण आत्तापासून गणेशमूर्ती शाळा गजबजून जाणार आहेत. अनेक व्यावसायिक व भक्तगण यांना तशी तयारी करायची आहे. महत्वाचे म्हणजे जिह्यात सार्वजनिक सुमारे 35 तर घरगुती सुमारे 68 हजार 291 ठिकाणी गणरायाचे धूमधडाक्यात पूजन होते. यावर्षीही सणाचा उत्साह निर्माण होऊन कोरोना हद्दपार होवो, यासाठी भक्तगण प्रार्थना करीत आहेत.
गणेश चतुर्थी हा सण कोकणात घराघरात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईतील चाकरमानी मोठय़ा प्रमाणात उपस्थित राहत असतात. मात्र, यावर्षी परिस्थिती अस्थिर आहे. काय, कधी होईल हे सांगता येऊ शकत नाही. यावर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये रामनवमी, हनुमान जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हे उत्सव कधी नव्हे ते छोटेखानी करावे लागले. मात्र, ज्या सणाची म्हणजेच गणेशोत्सवाची लगबग भक्तांना असते, त्या सणाची आतुरता आहेच. पण, प्रशासन काय भूमिका घेते? यासंबंधी खास करून जिल्हापातळीवर नियोजनाची आगाऊ रुपरेषा जाहीर करणे आवश्यकच आहे.
आगाऊ नियोजन आवश्यक
जिह्यात सार्वजनिक सुमारे 35 तर घरगुती सुमारे 68 हजार 291 ठिकाणी गणरायाचे आगमन होते. यासाठी गणेशमूर्तीशाळा या जून महिन्यापासून सुरू होतात. यावर्षी 22 ऑगस्टला गणपती पूजन आहे. त्यामुळे मूर्तीकाम जूनपासून सुरू होणे आवश्यक आहे. लॉकडाऊन किती दिवस वाढेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे मूर्तिकारांना आवश्यक माती पावसापूर्वी आणावी लागणार आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे अजून ते शक्य नाही. गेल्यावर्षी पूरजन्यपरिस्थितीमुळे मूर्ती वाळण्याच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यावर्षी लवकर मूर्ती बनविण्याच्या विचारत मूर्तीकार होते. पण, लॉकडाऊनमुळे नवी समस्या उभी ठाकली आली. सिंधुदुर्गमधील घरगुती गणपती हे साधारणतः पाच तर सार्वजनिक 21 दिवस असतात. त्यामुळे मूर्ती सांगणे, सीन बनविणे याबाबतचे नियोजन अगोदर करावे लागते. या सणाला चाकरमानी किंवा नातेवाईक विविध भागातून घरी येत असतात. त्यामुळे कोकण भक्तांनी गजबजते व भक्तीने प्रफ्फुल्लीत असते. त्यामुळे या सणाबाबतची आगाऊ रुपरेषा तयार करण्यासाठी विचार विनिमय आवश्यक आहे.
अनेकांचे गणेशचित्र शाळेवर पोट!
मूर्तिकार गणेश ठाकुर म्हणाले, सद्यस्थितीवरून पुढील परिस्थिती मांडता येणे अवघड आहे. माझ्यासह अनेकजण गणेशमूर्ती बनऊन आपल्या कुटुंबाचा वार्षिक उदरनिर्वाह करतात. अनेक शाळांत कामगार असतात. त्यांचीही उपजीविका यावर अवलंबून आहे. हे पाहता शासनाने या सणाबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. माती आणणे, मूर्ती बनविणे ते रंगकाम हा प्रवास खर्चिक अअसल्याचे ते म्हणाले









