ऑनलाईन टीम/नवी दिल्ली
सर्वच देशावर कोरोना महामारीचे संकट असतानाच आज लाडक्या विघ्नहर्ता गणरायाचं आगमन होत आहे. कोरोनामुळे सण-उत्सवावर निर्बंध असल्याने सगळीकडेच बाप्पांचे आगमन अगदी साधेपणाने केलं जात आहे. उत्सवावर संकट असले तरी नागरिकांमध्ये उत्साह कायम आहे. सर्वच जण शासनाच्या नियमाचे पालन करत आपल्या गणरायाला घेवून घरी जात आहेत. यामुळे सर्वत्र चैतन्यमय वातावरण आहे.
गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ट्विट करत गणेशोत्सवाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या ट्विटमध्ये, “तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया ! तुमच्यावर गणेशाची कृपा कायम राहो. सर्वत्र आनंद आणि भरभराट असो” असं म्हटलंय.
तर, शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून महाराष्ट्रातील तमाम जनतेला श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!गणपती बाप्पा मोरया! असं ट्विट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हे ट्विट रिट्विट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “मनाला प्रसन्न करणारे श्रीगणेशाचे सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी रूप हे मानवासाठी सौख्याचे अधिष्ठान आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे,ही श्रींचरणी प्रार्थना. सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!,” दिल्या.