मंदिरे खुली करण्यासाठी भाजप आक्रमक ः सरकारकडून देव, धर्मांवर अन्याय
प्रतिनिधी/सांगली
गेल्या पाच महिन्यापासून बंद असलेली धार्मिक स्थळे सुरु करावीत, या मागणीसाठी भाजप पुन्हा आक्रमक झाले आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्यावतीने सोमवारी राज्यभरात आंदोलने करण्यात आली. सांगलीतही गणपती मंदिरासमोर घंटानाद-महाआरती आंदोलन करण्यात आले. ठाकरे सरकारकडून देव, धर्मांवर सातत्याने अन्याय केला जात आहे, असा आरोप अध्यात्मिक आघाडीचे संयोजक ह.भ.प. अजयकुमार चंद्रशेखर वाले यांनी केला.
वाले म्हणाले, ठाकरे सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. मात्र मद्यालय, बाजार पेठा, मॉल, किराण माल दुकाने, कापड दुकाने सराफ कट्टा येथील व्यवहार खुले केले आहेत. या ठिकाणी गर्दी होतच असते. मंत्र्याचे दौरे, आमदाराचे विवाह समारंभ याठिकाणी मनमानी गर्दी होते. त्यावेळी कोरोना होत नाही. फक्त मंदिरे उघडी असली, तरच कोरोना होतो, हेच कळेनासे झाले आहे.
धार्मिक स्थळाच्या ठिकाणी भाविक भक्ताचे अनन्य श्रद्धा आहे असे सांगत वाले म्हणाले, मनशांती आणि समाधान मिळण्याची ही पवित्र स्थाने बंद असल्याने कोरोना व महापुराने पिचलेली जनता अधिकच उदास आणि त्रस्त आहे. मंदिरावर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना राज्य सरकारकडूनही आर्थिक मदत देलेली नाही. देशातील अन्य राज्यात मात्र सर्व मंदिरे चालू आहेत. देव धर्मावर सातत्याने ठाकरे सरकारकडून अन्याय सुरु आहे.
आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, माजी आमदार नितीन शिंदे, निता केळकर, युवराज बावडेकर, दीपक माने, श्रीकांत शिंदे, ह.भ.प निशीकांत शेटे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा ऍड. स्वाती शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, अनुसूचित मोर्चाचे अमित भोसले, पृथ्वीराज पवार, गौतम पवार, यांच्यासह भाजपचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.








