पणजी/ प्रतिनिधी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ता, वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन राज्यात सुरू असलेल्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या प्रगतीविषयी चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांनी अनमोड घाटावरील महामार्गाच्या विस्तारासंबंधी लोकांच्या मनात असलेली भिती व्यक्त केली. सडा-वरूणापूरी महामार्गाच्या सुरू असलेल्या कामात त्यांनी लक्ष घालून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली. यावेळी सदानंद शेट तानावडे यांचीही उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय जहाजबांधणीमंत्री मनसुख मांडवीय यांचीही भेट घेतली आणि कोळसा हाताळणीप्रकरणी गोव्यातील लोकांच्या असलेल्या भावना व्यक्त केल्या. मांडवीय यांनी या प्रकरणाकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
आपल्या नवी दिल्ली भेटीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी रेल्वे, वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशीही चर्चा केली. तसेच, गोवा राज्यातील पायाभूत व आधुनिक साधनसुविधा विकासासाठी अधिक साहाय्य प्राप्त करण्यावर नाबार्डचे अध्यक्ष चिंतला यांच्याशीही चर्चा केली.









