विविध महाविद्यालये-शाळांमधील खेळाडूंचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्य पातळीवरील स्पर्धा भरविल्या जात नाहीत. याचबरोबर इतर स्थानिक स्पर्धाही भरविण्यास परवानगी दिली जात नाही. त्याचा परिणाम खेळाडूंवर होत आहे. केवळ स्पर्धांवरच बंदी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे खेळाडूंतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून आमच्या भविष्याचा विचार करून तातडीने स्पर्धा भरविण्यास मुभा द्यावी, अशी मागणी विविध शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवडणुका किंवा इतर राजकीय कार्यक्रमांसाठी मुभा दिली जात आहे. त्यावेळी कोरोनाचा प्रसार होत नाही का? केवळ खेळाडूंनाच अशाप्रकारे वेठीस धरणे योग्य आहे का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे खेळामधून अनेक विद्यार्थी घडले जातात. त्यांना खेळातून नोकरीसाठी विविध क्षेत्रामध्ये राखीवता मिळते. तेव्हा तातडीने राज्यपातळीवरील स्पर्धांचे आयोजन करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
बॉक्सिंग, कराटे, कब्बडी, हॉलीबॉल, फुटबॉल, कुस्ती, थ्रोबॉल यासह इतर स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे आहे. कारण खेळाडू त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर तसेच भविष्यावर परिणाम होत आहे. तेव्हा तातडीने सर्व स्पर्धांचे आयोजन करण्यास मुभा द्यावी, सरकारनेही स्पर्धा आयोजित कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









