प्रतिनिधी/ चिपळूण
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी खेर्डी ग्रामपंचायतीवर 15 वर्षे सत्ता उपभोगली. कार्यकर्त्यांच्या जीवावर मिळालेल्या या सत्ता कालावधीत विकास न करता गरिबांना मात्र त्यानी देशोधडीला लावले असल्याचा आरोप खेर्डीतील अप्पा दाभोळकर यांच्यासह संघर्ष समितीने सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
खेर्डी पाणी योजनाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर चार दिवसांपूर्वी खताते यांनी केलेल्या आरोपाला सोमवारी अप्पा दाभोळकर, माजी पंचायत समिती सदस्य अनिल दाभोळकर, धाकटू खताते, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे यांनी यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, गावासाठी 14 कोटी रूपयांची पाणी योजना होत आहे. ती सर्वांनाच हवी आहे. मात्र ती साकारताना जयंद्रथ खताते व काही व्यक्ती दंडेलशाही करीत आहेत. या योजनेकरिता प्रथम साठवण टाकी, त्याकडे जाणारा रस्ता यासाठी जागा संपादित करणे गरजेचे होते. मात्र खताते यांच्या पत्नी जयश्री खताते या त्यावेळच्या सरपंच व हे पाणी योजनेचे अध्यक्ष त्यामुळे सुरूवातीपासूनच मनमानी कारभाराला सुरूवात झाली. प्रथम चढय़ा दराने साठवण टाकीसाठी जागा घेतली. त्यानंतर दादागिरी करून त्या टाकीकडे जाणारा रस्ता करण्यास सुरूवात केली. ते करताना कोणत्याही जमीन मालकाला विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळेच तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
आपण तक्रारी करतो हे खरे आहे, पण त्या न्यायहक्कासाठी असून प्रत्येकठिकाणी माझ्या बाजूने निकाल लागला आहे. पुण्यातील टेल्को कंपनीने हाकलून दिल्यावर खताते यांना राजकारणात आम्ही आणले आहे. त्यामुळे पोलीस खात्यात 33 वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱयाबाबत बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. खताते यांना बाळासाहेब माटे यांच्यासह सर्वांनीच बाजूला केले होते. त्यामुळे त्यांनी त्यांची नावे घेऊच नयेत, असेही दाभोळकर यांनी नमूद केले.
यावेळी उपसरंपच विकल्पा मिरगल, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, प्रकाश साळवी, रियाज खेरडकर, उमेश खताते, विनोद खताते आदी उपस्थित होते.









