प्रतिनिधी/ खेड
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शासनाने ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सूट दिल्याने वीज ग्राहकांकडून वीज भरणाच झालेला नाही. शहरासह तालुक्यातील 95 हजार 681 ग्राहकांनी महावितरणचे 12 कोटी 93 लाख 63 हजार रूपयांचे वीजबिल थकवल्याने ही वसुली करण्याचे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे.
मार्च महिन्यापासून महावितरणने ग्राहकांना वीज देयके देण्याऐवजी वापरानुसार वीजबिल भरण्याबाबत सूचित केले होते. मात्र असंख्य ग्राहकांनी वीजबिल भरणाच केलेले नाही. गेल्या तीन महिन्यांत ग्राहकांनी वीजबिलापोटीची रक्कम न भरल्याने कोटय़वधी रूपयांची थकबाकी ग्राहकांकडे शिल्लक राहिली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वीजबिले भरण्यास असमर्थता दर्शवली. त्यातच लॉकडाऊनमध्ये आलेल्या शिथिलतेनंतर कोरोनाबाधित क्षेत्र वगळता अन्य भागात वीज मीटरचे रिडींग घेऊन वीजबिले घेण्यास सुरूवात केली होती. मात्र ही वीजबिले वाढीव आल्याचा सूर ग्राहकांकडून आळवण्यात येत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला असून आर्थिक चणचण भासत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ करण्याची मागणीही करण्यात येत आहे. मात्र महावितरणकडून वीजबिले भरणा करण्याबाबत सातत्याने ग्राहकांना सूचना केल्या जात आहेत. वीज देयकांअभावी वीजबिले थेट ऑनलाईन भरण्याबाबतही ग्राहकांना सक्ती केली जात आहे. तालुक्यात 95 हजार 681 घरगुती ग्राहकांकडे 12 कोटी 93 लाख 63 हजार रूपयांची थकबाकी शिल्लक राहिल्याने महावितरणला ही वसुली करण्यासाठी आतापासूनच आटापीटा करावा लागत आहे. वाणिज्यिक 5842 ग्राहकांकडे 1 कोटी 99 लाख 79 हजार, औद्योगिक 927 ग्राहकांकडे 1 कोटी 85 लाख 17 हजार, कृषीच्या 2 हजार 199 ग्राहकांकडे 46 लाख 89 हजार रूपये थकीत आहेत. 472 पथदीपांचे 2 कोटी 10 लाख 72 हजार थकीत असून अन्य 71 ग्राहकांकडे 4 लाख 34 हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या 668 ग्राहकांकडे 1 कोटी 27 लाख 78 हजार, इतर सार्वजनिक सेवांसाठी 1281 ग्राहकांकडे 52 लाख 48 हजार थकीत आहेत.









