प्रतिनिधी / खेड
ऑनलाईन मोबाईल खरेदीच्या नादात अज्ञाताने एकास ५१ हजाराचा ऑनलाईन गंडा घालून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पाटीदार भवननजीकच्या कृष्णगुंज इमारतीत राहणाऱ्या विजय पवार यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.
बायमाय मोबाईल या कंपनीच्या वेबसाईटवर फोन करून नवीन मोबाईल फोनच्या खरेदीकरिता पवार यांनी ४१९९ रूपये भरणा केले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर फोन करून त्यांना एका लिंक पाठवत फॉर्म भरण्यास सांगितले. पवार यांनी फॉर्म भरून पाठवल्यानंतर अज्ञाताने आय सी आय. सी. आय. व बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील ४६ हजार रूपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस स्थानकात धाव घेतली.









