प्राथमिक विद्यार्थ्याची पोलीस स्थानकात तक्रार
आंध्रप्रदेशात पोलीस तक्रारीचे एक असे प्रकरण समोर आले आहे, जे वाचून तुमच्या चेहऱयावर हास्य उमटेल. येथील प्राथमिक शाळेत शिकणारा एक विद्यार्थी स्वतःच्या वर्गमित्राची तक्रार करण्यासाठी पोलीस स्थानकात पोहोचला. हा मुलगा अनेक दिवसांपासून माझी पेन्सिल चोरत असल्याने याची तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
व्हिडिओ व्हायरल
आंध्रप्रदेश पोलिसांनी प्राथमिक शाळेतील वादाचा हा व्हिडिओ ट्विटर हँडलवर शेअर केला असून तो आता व्हायरल झाला आहे. व्हिडिओत एक मुलगा हिरव्या रंगाचे शर्ट घातलेल्या विद्यार्थ्याकडे हात करून तो अनेक दिवसांपासून माझी पेन्सिल चोरत असल्याचे सांगताना दिसून येतो. तसेच पोलिसांना याचा पुरावाही देतो. तुम्ही याच्या विरोधात गुन्हा नोंदवा असे हा मुलगा पोलिसांना सांगत असल्याचे यात दिसून येते.

पोलिसांनी घडविली तडजोड
मुलाने वर्गमित्राच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचा हट्ट धरल्याने पोलिसांनी अत्यंत संयमाने त्याची तक्रार ऐकून घेतली. संबंधित मुलाच्या चुकीबद्दल पुन्हा विचार कर. तू जर गुन्हा नोंदविलास तर त्याला तुरुंगात जावे लागेल आणि मग त्याच्यासमोर अनेक समस्या उभ्या राहतील असे पोलिसांनी त्याला मुलाला समजाविले. त्यानंतर दोन्ही मुलांमध्ये तडजोड घडवून आणत हस्तांदोलन करण्यास सांगितले. यादरम्यान पोलीस स्थानकात पोहोचलेल्या अन्य शालेय विद्यार्थ्यांना हसू आवरत नव्हते.
पुन्हा असे करणार नाही
तडजोडीनंतरही तक्रार करणारा मुलगा गुन्हा नोंदविण्याचा हट्ट करत होता. यावर भविष्यात तो पुन्हा चोरी करणार नसल्याचा विश्वास आम्ही देत असल्याचे पोलिसांनी त्याला सांगितले. तर पेन्सिल चोरणाऱया मुलाला भविष्यात शिक्षणावर लक्ष दे असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.









