आणखी दोघा जणांचा शोध सुरु
नशेत माचीस मागितल्यावरुन झालेल्या वादावादीनंतर चित्रदुर्ग येथील एका ट्रक क्लिनरच्या डोक्मयात बिअर बाटली व दगडाने हल्ला करुन त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
राजू मल्लेशी लोकरे (वय 22, रा. मंगाईनगर, वडगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर भा.दं.वि. 302 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचे आणखी दोन साथीदार अद्याप फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
बुधवारी रात्री शहापूर पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन राजूला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाच्या आदेशावरुन त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
मंगळवारी मध्यरात्री जुने बेळगाव परिसरातील शेतवडीत महम्मदसमीउल्ला (वय 41, रा. चित्रदुर्ग) या क्लिनरचा भीषण खून करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी राजूला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.









