खानापूर / प्रतिनिधी
केंद्र सरकारने मंजूर केलेला नवीन शेतकरी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शेतकऱयांनी मंगळवार दि. 7 रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱयांच्या या आंदोलनाला खानापूर तालुका म. ए. समितीने आपला पाठिंबा व्यक्त केला असून नवीन कायदे रद्द करावेत, अशा मागणीचे निवेदन म. ए. समितीच्यावतीने मंगळवार दि. 8 रोजी तहसीलदारांना सादर करण्याचा निर्णय सोमवारी इदलहोंड येथे झालेल्या खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील होते.
प्रारंभी कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी उपस्थित संदस्यांचे स्वागत करुन बैठकीचा उद्देश विशद केला. यावेळी येत्या दि. 22 डिसेंबर रोजी होणाऱया ग्राम पंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. तालुक्यातील मराठी भाषिकांचे वर्चस्व असलेल्या प्रत्येक गावानी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कोणताही वादविवाद न आणता गावच्या निवडणुका बिनविरोध पार पाडाव्यात, तसेच ग्रा. पं. वर म. ए. समितीशी निगडित असलेल्या सदस्यांचीच निवड व्हावी या दृष्टीने प्रयत्न करावेत, तसेच सीमाप्रश्न सुटेपर्यंत राजकीय पक्षांच्या कोणत्याही प्रलोबनाला बळी न पडता ग्राम पंचायतीवर म. ए. समितीचाचा भगवा फडकवावा, अशी मराठी भाषिकांना विनंती करणारा ठरावदेखील बैठकीत संमत करण्यात आला.
कागदपत्रे मराठीतूनच देण्याची मागणी
तालुका प्रशासनाने आगामी ग्राम पंचायत निवडणुकीत मराठी भाषिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने मतदारयाद्या, कागदपत्रे व निवडणुकीसंदर्भातील सर्व माहिती मराठीतून देण्याच्या मागणीचा आग्रह या बैठकीत करण्यात आला.
यासंदर्भात बोलताना बैठकीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, लोकशाही राज्यात जनतेला राज्य कारभारातील सर्व पैलूंची योग्य व स्पष्ट माहिती होण्यासाठी त्यांच्या भाषेत कागदपत्रे व माहिती मिळणे आवश्यक आहे. ती देण्यात स्थानिक प्रशासन असमर्थ ठरत असेल तर लोकशाही राज्यातील ती फार मोठी शोकांतिका आहे. जनतेला आवश्यक असलेल्या भाषेतून माहिती व कागदपत्रे न देता त्यांना मूलभूत हक्कांपासून डावलण्याचा प्रकार संतापजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या बैठकीला माजी जि. पं. सदस्य विलास बेळगावकर, तालुका भुविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, जि. पं. सदस्य जयराम देसाई, नारायण कार्वेकर, माजी ता. पं. सदस्य नारायण कापोलकर व महादेव घाडी, विठ्ठल गुरव, प्रकाश चव्हाण, विवेक गिरी, नारायण पाटील, अमृत पाटील, रुक्माण्णा झुंजवाडकर, देवाप्पा भोसले गुरुजी यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रा. पं. निवडणुकीसंदर्भात म. ए. समिती कार्यकर्त्यांच्या काही अडचणी असल्यास त्यांनी म. ए. समिती नेत्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी, असेही आवाहन बैठकीच्या शेवटी करण्यात आले.









