भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांचा इशारा : अपुऱया बसेसमुळे विद्यार्थांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय ; आगार प्रमुखांनी वेळीच दखल घ्यावी
प्रतिनिधी / खानापूर
खानापूरहून सकाळच्यावेळी बेळगावला जाण्यासाठी बससेवा अपुऱया असल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणाऱया विद्यार्थीं वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. यासंदर्भात आगार प्रमुखांना वेळोवेळी सूचना देऊनही बससेवा सुरू केल्या जात नाहीत, यामुळे विद्यार्थी वर्गाला वेळेत महाविद्यालयाला पोहचणे कठीण जात असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आगार प्रमुखांनी याची वेळीच दखल घ्यावी, अन्यथा यासाठी आंदोलन छेडावे लागले असा इशारा भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांनी दिला आहे.
खानापूरहून तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बेळगावातील विविध महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. यामुळे सकाळी 7 ते 9 या वेळेत बेळगावला जाण्यासाठी राजा शिवछत्रपती चौकातील जुन्या बसस्थानकावर तसेच मुख्य बसस्थानकावर विद्यार्थ्यांची बरीच गर्दी असते. त्यातच तालुक्याच्या ग्रामीण भागातून सकाळच्यावेळी बेळगावला थेट बससेवा नसल्याने केवळ खानापूरपर्यंतच ग्रामीण भागातून बस येतात. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील त्या बसमधून खानापूरपर्यंत येतात. व खानापूरहून बेळगावला जाणाऱया बसची त्यांनाही प्रतीक्षा करावी लागत असल्याने विद्यार्थी वर्गाचे अतोनात हाल होत आहेत.
यामुळे सकाळी 7 ते 9 या वेळेत खानापूरहून बेळगावला प्रत्येक दहा ते पंधरा मिनिटाला एक बस सुरू ठेवली तरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वेळेपूर्वी बेळगावला पोहचता येऊ शकेल. लॉकडाऊनपूर्वी सात ते नऊ या वेळेत खानापूरहून बेळगावला जाण्यासाठी बऱयाच बससेवा सुरू होत्या. तसेच वस्तीसाठी ग्रामीण भागात गेलेल्या बसही थेट बेळगावपर्यंत जात होत्या. यामुळे विद्यार्थी महाविद्यालयाच्या वेळेत बेळगावला पोहचत होते.
वस्तीच्या बसदेखील बेळगावपर्यंत सोडाव्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर तब्बल चार महिन्यानी महाविद्यालये सुरू झाली आहेत. यामुळे त्या चार महिन्यात प्रवाशांची संख्या कमी असल्याने नियमित बससेवा सुरू झाल्या नव्हत्या. पण आता विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन सकाळी 7 ते 9 या वेळेत प्रत्येक दहा ते पंधरा मिनिटाला बेळगावला बस सुरू करावी तसेच ग्रामीण भागात वस्तीला गेलेल्या बसदेखील फक्त खानापूरपर्यंत न सोडता त्या बेळगावपर्यंत कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.









