२० नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान : सुहास शिंदेंच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी : फटाक्यांची आतषबाजीने जल्लोष
वार्ताहर / खानापूर
केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०२० अंतर्गत झालेल्या सर्व्हेक्षणात खानापूर नगरपंचायतने सातत्यपूर्ण कामगिरी राखत पुन्हा एकदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नगरपंचायतच्या या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २० नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात नगरपंचायतचा सन्मान करण्यात येणार आहे.
खानापूर जनता विकास आघाडीचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिकांनी दिलेल्या सहकार्याने खानापूर नगरपंचायतची मान उंचावली आहे. शहरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाने हे शक्य झाले, अशी माहिती नगराध्यक्षा स्वाती टिंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खानापूर नगरपंचायतच्या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात मुख्याधिकारी आश्विनी पाटील यांच्यासह उपनगराध्यक्ष अमोल सरगर, माजी नगराध्यक्ष अली अकबर पिरजादे, माजी नगराध्यक्ष तुषार मंडले, माजी नगराध्यक्षा भारती माने, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर, माजी उपनगराध्यक्षा सुनीता भगत, गट नेत्या मंगल मंडले, नगरसेविका डॉ. वैशाली हजारे, नूतन टिंगरे, सुरेखा डोंगरे, रेखा कदम, उमेश धेंडे यांच्यासह सर्व नगरसेवक,कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले. खानापूर नगरपंचायतचा राज्यात प्रथम क्रमांक आल्याचे समजताच शहरातील नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. शहरात गेल्या पाच वर्षात विविध विकासकामांच्या माध्यमातून सत्ताधारी गटाने केलेल्या कामाचे फळ म्हणून राज्यात नंबर मिळाला असल्याचे मत व्यक्त करत शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.








