नवी दिल्ली/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. मागील वर्षभरात खाद्यतेलांच्या किंमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतानाच मोदी सरकारने खाद्यतेलासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात देशातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी आयात शुल्कात मोठी घट करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. सरकारनं आयात शुल्क तब्बल ५.५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारकडून गेल्या महिन्यात देखील खाद्य तेलावरील आयात शुल्कात घट केली होती. गेल्या वर्षभरात खाद्य तेलाच्या किमतीत तब्बल ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारनं ३० सप्टेंबरपर्यंत कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क ३०. २५ टक्क्यांवरुन २४.७ टक्के इतकं केलं आहे. तर रिफाइंड पाम तेलावरील आयात शुल्क ४१.२५ टक्क्यांवरुन ३५.७५ टक्क्यांवर आणलं आहे. रिफाइंड सोया तेल आणि सनफ्लावर तेलावरील आयात शुल्क देखील ३० सप्टेंबरपर्यंत ४५ टक्क्यांवरून ३७.५ टक्के इतकं करण्यात आलं आहे.