खादी बोर्डाचा निर्णय : ऑनलाईन स्वरुपात खादी उत्पादने विकता येणार
प्रतिनिधी / हुबळी
कोरोना महामारीच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी तसेच खादी उत्पादनांच्या विपणनाला चालना देण्यासाठी कर्नाटक राज्य खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ आता ई-मार्केटिंग व्यासपीठावर स्वतःची उपस्थिती दर्शविणार आहे.
खादी उत्पादनांवर 9000 पेक्षा अधिक सक्रिय खादी कार्यकर्ते अवलंबून आहेत. तर अशा कार्यकर्त्यांची एकूण संख्या 17000 पेक्षा अधिक आहे. टाळेबंदी आणि कोविडमुळे खादी उत्पादनांची विक्री न झाल्याने हे कार्यकर्ते अडचणीत आले होते. ही स्थिती विचारात घेत खादी महामंडळाने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडमुळे 207 खादी संघांमधील 280 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची खादी उत्पादने विक्रीविना पडून राहिली आहेत. खादी उद्योगाची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी खादी कार्यकर्त्यांना ई-मार्केटिंग सुविधा पुरविण्याचा विचार आहे. या सुविधेमुळे ऑनलाईन स्वरुपात खादी उत्पादने विकता येणार आहेत. महामंडळाची बैठक लवकरच होणार असून यात अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाईन कंपन्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवैभव स्वामी यांनी दिली आहे.
खादी संघांना मोठा दिलासा मिळणार
2018-19 पर्यंतचे प्रलंबित एमडीए तसेच अन्य प्रोत्साहन निधी प्रदान करण्यास अर्थ विभागाने मंजुरी दिली आहे. हा निधी 51.49 कोटींचा असून महिन्याभरात तो वितरित करण्यात येणार आहे. हा निधी वितरित झाल्याने खादी कार्यकर्ते तसेच खादी संघांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील 6 महिन्यांमध्ये आर्थिक स्थिती पूर्वपदावर येणार असल्याचे स्वामी म्हणाले.
बहुतांश खादी कार्यकर्ते हे 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. यातही महिलांचे प्रमाण अधिक आहे. हा मुद्दा विचारात घेत महामंडळ प्रशिक्षण केंद्रे सुरू करून खादीला उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच तरुणाईला यात सामील होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
डिझाईन तसेच अन्य गोष्टींचे 300 टेलर्सना महामंडळाने यापूर्वीच प्रशिक्षण दिले आहे. इंडियन इन्स्टीटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामुळे मोठय़ा संख्येत तरुण-तरुणी खादीकडे वळतील, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राचा दौरा
महामंडळाचे अध्यक्ष कृष्णप्पा गौडा एन.आर. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जयवैभव स्वामी यांनी राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राला भेट दिली आहे. खादी कार्यकर्ते तसेच बेळगाव तसेच धारवाड जिल्हय़ातील खादी संघाच्या कार्यालयातील कर्मचाऱयांशी त्यांनी संवाद साधला आहे.









