देवलीतील धक्कादायक घटना : वाळू काढणाऱया चौघा कामगारांवर अचानक हल्ला, एक गंभीर
कामगारांमध्ये भीतीचे वातावरण
वाळू व्यावसायिक आक्रमक
कडक कारवाईची मागणी
प्रतिनिधी / मालवण:
देवली खाडीपात्रात वाळू काढणाऱया भैय्या कामगारांच्या होडीवर दोघा व्यक्तींनी फावडे, कोयता आणि लाकडी दांडय़ांच्या सहाय्याने हल्ला चढविला. यात चौघे भैय्या कामगार गंभीर जखमी झाले. यातील एका कामगाराच्या डोकीवर मार बसल्याने तो थेट खाडीपात्रात कोसळला. सहकारी कामगारांनी खाडीपात्रात कोसळलेल्या कामगाराला होडीतून मालवण ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्या कामगाराचा मृत्यू झाला होता. अन्य तिघांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
गंभीर हल्ल्यात ठार झालेल्या कामगाराचे नाव सकलदीप सिंग (49, रा. झारखंड) असे आहे. तर गंभीर जखमी झालेल्या कामगारांमध्ये पकलू सिंग (42, रा. झारखंड), यमुना मनबहाल सिंग (53, रा. झारखंड), सकलदीप उसा सिंग (26, रा. झारखंड) यांचा समावेश आहे. दरम्यान, दोन्ही हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. हल्लेखोरांतील एका व्यक्तीवर यापूर्वीही निवती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असल्याचे समजते.
कामगार खाडीपात्रात कोसळला
मिळालेल्या माहितीनुसार, देवली खाडीपात्रात शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भैय्या कामगार एका होडीच्या साहय़ाने वाळू काढत होते. एकूण अकरा कामगार होते. वाळू काढत असताना अचानक दोन व्यक्ती छोटय़ा होडीच्या सहाय्याने या कामगारांच्या जवळ आले. त्यांनी थेट कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. संशयित आरोपी भिकाजी उर्फ तात्या पवार (38, रा. कालवंडवाडी चिपी, परुळे, ता. वेंगुर्ले) याने फावडय़ाच्या सहाय्याने सकलदीप याच्या डोकीवर हल्ला केला. यात तो खाडीपात्रात कोसळला. त्याला बाहेर काढण्यासाठी इतर कामगारांनी काही क्षणातच खाडीपात्रात उडय़ा घेतल्या. तर होडीवरील पकलू व इतर दोघांच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
आरडाओरड अन् मदतीसाठी याचना
हल्ला करण्यात आल्यानंतर कामगारांनी किनाऱयावर असलेल्या आपल्या मालकाला मदतीसाठी आरडाओरड केली. यावेळी होडी मालक व सहकाऱयांनी खाडीपात्राकडे धाव घेतली. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
पोलीस घटनास्थळी रवाना
मालवण ग्रामीण रुग्णालयात सकलदीप याचा मृतदेह आणल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांनी कामगारांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. तर इतर भैय्या कामगारांनाही पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून तक्रार दाखल करून घेण्याची कार्यवाही सुरू केली. देवली खाडीपात्रात वाद झाल्याची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी हे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी एका कामगाराला घेऊन घटनास्थळाची पाहणी केली.
वाळू व्यावसायिक आक्रमक
अधिकृत वाळू टेंडर घेऊन वाळू व्यवसाय करीत असताना अशाप्रकारे कामगारांवर खुनी हल्ला केल्याच्या घटनेचा वाळू व्यावसायिकांनी निषेध नोंदविला आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱया सर्वांवर कडक कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी यावेळी व्यावसायिकांनी केली. शासनाचा अधिकृत ठेका घेतलेला असताना अशाप्रकारे कामगारांना त्रास देऊन हल्ला करण्यात आल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कोटय़वधी रुपयांचे टेंडर भरलेले असताना वाळू काढण्यासाठी अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल प्रशासनाने कडक पाऊले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, वाळू व्यावसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबा परब यांनीही या प्रकरणाचा निषेध केला असून संशयितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
दोघा संशयितांवर गुन्हा दाखल
देवली खाडीपात्रात वाळू उत्खनन करणाऱया कामगारांवर जीवघेणा हल्ला करून एका कामगाराला ठार मारल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 302, 324, 323, 504, 506, 34 अन्वये तात्या पवार (38, रा. कालवंडवाडी) आणि राकेश रघुनाथ गावडे (25, रा. डिकवल, ता. मालवण) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी दिली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी साळुंखे यांनी मालवण पोलीस ठाण्याला भेट देत गुन्हय़ाबाबत माहिती घेतली.









