प्रतिनिधी / मडगाव
लॉकडाऊनच्या तिसऱया टप्प्यात काल सोमवारपासून खाजगी बसेस धावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. मात्र, प्रत्यक्षात दक्षिण गोव्यात एकही खाजगी बस रस्त्यावर आलीच नाही. त्यामुळे खाजगी बसवर अवलंबून असलेल्या लोकांचे बरेच हाल झाले. ग्रामीण भागातील अनेक लोक आपल्या कामाच्या ठिकाणी पोचू शकले नाहीत.
खाजगी बसेस केवळ 50 टक्के प्रवासी घेऊन चालविणे शक्य नसल्याने, खाजगी बसमालकांनी आपल्या बसगाडय़ा बंद ठेवणे पसंत केले. डिझेल, चालक व कंडक्टर यांच्यावर दररोज येणारा खर्च हा केवळ 50 टक्के प्रवासी घेऊन जुळत नाही. त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढावा अशी मागणी खाजगी बसमालक संघटनेने केली होती. दिवसाला किंमान 2505 रूपयांचा रिपोर्ट यायला पाहिजे व तशी व्यवस्था होत असेल तरच खाजगी बसेस रस्त्यावर येतील असे बस मालकांनी स्पष्ट केले आहे.
खर्चाचा ताळमेळ बसणार नाही
खाजगी बस मालकांनी 50 टक्के प्रवाशी घेऊन वाहतूक करायची झाल्यास, आत्ता जिथे 5 रूपये तिकीट आहे, त्या ठिकाणी 10 रूपये तिकीट आकारले जाईल. तरच खर्चाचा ताळमेळ जुळू शकतो असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यात लॉकडाऊनमुळे लोक घरातून बाहेर पडत नाही. केवळ सरकारी कर्मचारी तसेच खाजगी आस्थापनानी काम करणारे कर्मचारी तेवढेच बाहेर पडतात. त्यात अनेक जण स्वतःची वाहने घेऊन कामाच्या ठिकाणी जातात. त्यामुळे खाजगी बस मालकांना 50 टक्के सुद्धा प्रवासी भेटणे कठीण असल्याचे मत खाजगी बस मालकांनी मांडले आहे.
दरम्यान, काल संध्याकाळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी खाजगी बस मालक संघटणेकडे बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करताना प्रत्येक रूटावर केवळ दोन खाजगी बसगाडय़ा पुढील चार दिवस रोटेशन पद्धतीवर सोडाव्यात व दिवसाला किती रिपोर्ट येतो हे पहावे व नंतरच इतर बसगाडय़ा सोडण्या संदर्भात निर्णय घ्यावा असे सूचित केले आहे.
वाहतूकमंत्र्यांनी दिलेला हा प्रस्ताव सद्या खाजगी बस मालकांनी स्वीकारला असून आज मंगळवार पासून खाजगी बसगाडय़ा पुन्हा रस्त्यावर आणल्या जातील. केले जवळपास 36 दिवस खाजगी बसगाडय़ा बंद होत्या. त्या पुन्हा रस्त्यावर येत असल्याने बस मालकांना देखील थोडा दिलासा मिळाला आहे.









