मॉलमधल्या सौंदर्यप्रसाधनांच्या दालनातून किंवा मोठय़ा दुकानातून प्रसाधनांची खरेदी करणं खूप समाधान देऊन जायचं. मात्र टाळेबंदीच्या काळात अनेकींनी ऑनलाईन खरेदीवर भर दिला. त्यातही सौंदर्यप्रसाधनांची ऑनलाईन खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कोणतंही उत्पादन त्वचेच्या रंगाला साजेसं हवं. सौंदर्यप्रसाधनांच्या ऑनलाईन खरेदीबाबतचं हे मार्गदर्शन…
सौंदर्यप्रसाधनांची खरेदी करण्याआधी त्वचेबद्दल जाणून घ्या. तुमच्या त्वचेच्या रंग, पोत आणि संवेदनशीलतेनुसार खरेदी करा. उगाचच भारंभार प्रसाधनं विकत घेऊ नका. सेल आहे, सवलती मिळत आहेत किंवा मैत्रिणीने सुचवलं आहे म्हणून कोणतंही उत्पादन विकत घेऊन पैसे वाया घालवू नका. तुमच्या रंगरुपाला साजेश्या उत्पादनातच गुंतवणूक करा.
* सौंदर्यप्रसाधनांच्या खरेदीआधी त्यातल्या घटकांबद्दल जाणून घ्या. संशोधन करा. उत्पादनांबद्दलचे व्हिडिओ बघा. प्रतिक्रिया वाचा. जाहिरातींना भुलून खरेदी करू नका.
* ठराविक उत्पादनं शोधा. तुम्ही मस्कारा वापरत नसाल तर उगाच खरेदी करू नका. वेबसाईटवर उत्पादनांची मोठी यादी असते. तुम्ही तुम्हाला हवं असणारं उत्पादन शोधा. साईटवर विभाग, उपविभाग असतात. त्यामुळे ठराविक उत्पादनांची यादी तुमच्यासमोर खुली होते आणि खरेदी करणं सोपं होतं. * साईटवरील सवलतींची माहिती घ्या. मात्र सवलत मिळतेय म्हणून खरेदी करू नका. सौंदर्यप्रसाधनांचं आयुष्य कमी असतं. त्यामुळे गरज नसताना खरेदी करू नका.









