निगवे दुमाला – केर्ले रस्त्यावर घडली दुर्घटना : महिन्यातील दुसरी घटना
शिये/प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील निगवे दुमाला – केर्ले रस्त्यावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर – ट्राॅली पलटी झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका महिन्यात ही दुसरी घटना घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या दुरावस्थेकडे का दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न वाहनधारक व नागरीकांतून विचारला जात आहे.
ट्रॅक्टर- ट्राॅली दत्त दालमिया साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करत होता. निगवे दुमाला कडून केर्लेकडे जाताना वळणावर असलेल्या खड्ड्यामुळे तो उलटला.दोन्ही ट्राॅल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ऊस रस्त्यावर विखुरला आहे. त्यामुळे अशा रस्त्याने ऊस वाहतूक कशी करायची असा प्रश्न ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना पडला आहे. तसेच जोतिबा – पन्हाळ्याकडे जाणारे पर्यटक याच मार्गाने जातात. त्यामुळे वाहनधारक व प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे लक्ष देऊन तात्काळ खड्डे बुजवावेत अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी व वाहनधारकांतून होत आहे.









