परिसरात खळबळ – खुनाचा प्रकार असण्याची शक्यता
प्रतिनिधी/ सातारा
एकीकडे कोरोनाची स्थिती दिलासादायक होत असताना जिल्हय़ात सलग खुनाच्या घटना समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी वाठार बुद्रुक (ता. खंडाळा) व चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथील खुनाच्या घटना ताज्या असतानाच सोमवारी दुपारच्या सुमारास खंडाळा येथील खंबाटकी घाटात एका महिलेचा अर्धवट स्थितीत जळलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार असल्याचे दिसून येत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली. खंडाळा येथील खंबाटकी घाटाची सुरुवात होते. त्या ठिकाणी एका महिलेचा अर्धवट स्थितीत जळालेला मृतदेह आढळून आला आहे. या महिलेच्या हातात अंगठय़ा असून डाव्या हातावर काहीतरी गोंदलेले आहे. अंगावरील कपडे जळालेल्या स्थितीत आहेत.
प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार दिसून येत असून अज्ञाताविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेची ओळख पटवणे आणि घटनेतील संशयितांना शोधून काढणे हे पोलिसांपुढे आव्हान असल्याचे धीरज पाटील यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळात जिह्यात खुनांचे सत्र सुरू झाले आहे. वाठार बुद्रुक, चिंचणेर वंदन येथील खुनांच्या घटनेतील आरोपींना जेरबंद केले असताना खंडाळा घाटात सलग खुनाची तिसरी घटना घडल्यामुळे खुनाच्या या मालिकेमुळे जिल्हा हादरून गेला आहे.









