एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी : बेकवाडनजीक दुर्घटना
प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर-अळणावर मार्गावरील बेकवाडनजीक दुचाकीला क्रुझरने ठोकरल्याने झालेल्या आपघातात एकजण जागीच ठार तर त्यांचा पुतण्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव ठकू लखू यमकर (वय 60) असे असून गंभीर जखमीचे नाव जानू यमकर असे आहे. हे दोघेही चंदगड तालुक्यातील कानूरजवळील केरल्याचावाडा येथील रहिवासी आहेत. त्या दोघांसह आणखी दोघे दुसऱया दुचाकीवर स्वार होते. त्यांच्याही दुचाकीला पुझर धडकली पण ते किरकोळ जखमी झाले. ते चौघेही यल्लापूर येथे आपल्या नातेवाईकांकडे दिवस कार्यासाठी गेले होते. परत आपल्या गावी जात असताना बेकवाडजवळ या प्रुझरने प्रथम ठकू चालवत असलेल्या दुचाकीला व नंतर त्या पाठोपाठ येणाऱया दुचाकीलाही धडक दिली. यामध्ये ठकू यांच्या डोकीला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला. तर त्यांच्या मागे बसलेला जानू हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बेळगावच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुसऱया दुचाकीवरील दोघेही किरकोळ जखमी असल्याने त्यांच्यावर खानापुरातील दवाखान्यात उपचार करण्यात आले. या अपघाताची नंदगड पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.









