मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चेक वितरण : राज्यातून तिघांची ऑलिम्पिकसाठी निवड
प्रतिनिधी /बेंगळूर
जपान येथे होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कर्नाटकातून निवड झालेल्या तीन खेळाडूंना क्रीडा आणि युवजन खात्यातर्फे 10 लाख रुपयांचे प्रोत्साहन धन देण्याची घोषणा करण्यात आली होती. सदर प्रोत्साहनधन बुधवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी वितरीत केले.
मुख्यमंत्र्यांचे बेंगळूरमधील गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे पार पडलेल्या कार्यक्रमात कर्नाटकातून ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या क्रीडापटू श्रीहरि नटराज याला येडियुराप्पा यांनी प्रोत्साहन धनाचा चेक दिला. त्याचप्रमाणे अदिती अशोक आणि पौवाद मिर्झा यांच्या प्रोत्साहन धनाचा चेक त्यांच्या पालकांकडे देण्यात आला. तसेच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱया राज्यातील खेळाडूंना 5 कोटी रुपये, रौप्यपदक जिंकणाऱयांना 3 लाख रुपये आणि कास्यपदक मिळविणाऱया खेळाडूंना 2 कोटी रुपये देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
ऑलिम्पिकच्या जलतरण क्रीडाप्रकारात भारताची टीम प्रथमच सहभागी होत आहे. त्यामध्ये कर्नाटकातील एका खेळाडूचा सहभाग असणे ही अभिमानास्पद बाब आहे. राज्यातून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱया तिघांनी सुवर्णपदकाला गवसणी घालावी, अशा शुभेच्छा क्रीडामंत्री डॉ. नारायणगौडा यांनी दिल्या.
अदिती अशोकने गोल्फ क्रीडाप्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी केली आहे. 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये ती सहभागी झाली होती. तर श्रीहरि नटराज याने 2016 मध्ये साऊथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत जलतरण क्रीडाप्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. तर 2017 मध्ये उब्झेकिस्तान येथे पार पडलेल्या 9 व्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावले. तर 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये भाग घेतला होता. इक्वेस्टियनपटू पौवाद मिर्झाने 2018 मध्ये पार पडलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये रौप्यपदक मिळविले होते.









