वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबईच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये बरीच वर्षे क्रिकेट स्कोरर म्हणून सेवा बजावत असलेले 55 वर्षीय दीपक जोशी आता सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारी संकट विरोधातील युद्धामध्ये आघाडीचे योद्धे म्हणून काम करीत आहेत.
दीपक जोशी हे सध्या मुंबईतील विरार या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत. गेल्या 28 वर्षांच्या कालावधीत ते दक्षिण मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तंत्रज्ञ म्हणून सेवा बजावीत आहेत. दीपक जोशी 24 मे रोजी या खासगी रूग्णालयात आपल्या सेवेत दाखल झाले. या रूग्णालयामध्ये एक्स-रे विभागात ते कार्यरत असून संशयित कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी ते झटत आहेत. देशातील कोरोना महामारी संकटामुळे दीपक जोशी यांचे जवळपास एक महिना वास्तव्य या खासगी रूग्णालयात होते. आपल्या आठ तासांच्या सेवेमध्ये ते सुमारे 15 ते 20 कोरोना संशयित रूग्णांच्या छातीचे एक्स-रे काढतात. या रूग्णालयाने त्यांची राहण्याची व्यवस्थाही केली होती. मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने त्यांना आता अधिक कालावधीसाठी रूग्णालयात रहावे लागेल. दीपक जोशी यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून या सेवेसाठी नेहमी प्रोत्साहन मिळत आहे. पण पत्नी आणि मुली त्यांच्या आरोग्याविषयी नेहमीच काळजी करत आहेत.
मुंबई क्रिकेट संघटनेचे दीपक जोशी हे अधिकृत क्रिकेट स्कोरर असून त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील 328 सामन्यांत स्कोररची कामगिरी बजावली आहे. त्यांनी 11 कसोटी, 21 वनडे आणि 5 टी-20 सामन्यात अधिकृत स्कोरर म्हणून सेवा बजावली आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या सर्व पदाधिकाऱयांनी दीपक जोशी यांना त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. कोणत्याही क्षणी गरज भासल्यास आपण या सेवेसाठी उपलब्ध राहू, अशी ग्वाही दीपक जोशी यांनी दिली आहे.









